विरोधकांना काढले चिमटे, ट्रम्पवरदेखील केली टीका : शेतकरी हितासाठी ‘बौद्धिक’ मात्र नाही लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे नेहमीच समाजातील विविध विषयांवर भाष्य करीत असतात. कधी ते गोहत्याबंदीचे समर्थन करतात, तर कधी आरक्षण बदलाची आवश्यकता असल्याचे ठामपणे सांगतात. संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपप्रसंगी त्यांनी देशातील विरोधकांवर टीका केली. अगदी सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या पर्यावरणविषयक धोरणांवरदेखील आसूड ओढले. मात्र आपल्या हक्कांसाठी बालबच्च्यांसह रस्त्यांवर उतरलेल्या महाराष्ट्राच्या मातीतील शेतकऱ्याच्या आंदोलनाबाबत मात्र त्यांनी ‘ब्र’ देखील उच्चारला नाही. कोट्यवधींचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या हितासाठी त्यांनी शासनाला ‘बौद्धिक’ का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महाराष्ट्रासोबतच मध्यप्रदेशातदेखील शेतकरी आंदोलनाचे लोण पसरले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी ‘शहीद’ झाले. इतकेच नव्हे तर राज्यातील एका भूमिपुत्राला कर्जाच्या ओझ्यामुळे स्वत:च्या प्राणांचा त्याग करावा लागला. संघाचे कार्य प्रत्येक क्षेत्रात चालते व कृषी क्षेत्रातदेखील काही प्रकल्प चालतात. अनेक शेतकरी संघाचे स्वयंसेवक आहेत व त्यांनी आपल्या कष्टाने संघवाढीत हातभार लावला आहे. अगदी तृतीय वर्ष वर्गातदेखील अनेक शेतकरी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे संघाला शेतकऱ्यांना ‘सुलतानी’ कारभारामुळे जी झळ लागते, त्याची चांगल्याने कल्पना आहे. देशविदेशातील मुद्यांवर भाष्य करत असताना सरसंघचालक मरणपंथाला लागलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारचे कान टोचतील किंवा उद्बोधनात्मक सल्ला तरी देतील, अशी स्वयंसेवक तसेच उपस्थितांना आशा होती. मात्र देशहितासाठी सदैव ‘दक्ष’ असलेल्या सरसंघचालकांनी शेतकरी आंदोलनावर मौन राखले आणि या आशांवर पाणी फेरल्या गेले.कोणत्याही राज्यात एखादी समस्या निर्माण झाली की तेथील भाजपाचे प्रमुख नेते संघस्थानी येऊन मार्गदर्शन घेतात. महाराष्ट्र, मध्यप्रदेश या दोन भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाचे निमित्त साधत सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना मार्गदर्शन केले नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांचे भाषण सुरू असताना एका शेतकऱ्याने मध्येच उभे राहून भाषणबाजी बंद करा, आधी सातबारा कोरा करा, असे सुनावले होते. त्या शेतकऱ्याची लसाधी दखलही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली नव्हती. यावर बरीच टीका झाली. आता सरसंघचालकांनीही मौन पाळल्याने शेतकरी दुर्लक्षितच राहील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सरसंघचालकांचे शेतकरी आंदोलनावर मौन
By admin | Published: June 09, 2017 2:28 AM