नागपूर : नागपुरात अधिवेशन घेण्याबाबत राज्य शासनाने परत एकदा घूमजाव केले असून, विदर्भाला परत डावलण्यात आले आहे. याबाबत विरोधकांसह विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचा सूर असून, विदर्भातील मंत्री व लोकप्रतिनिधींनी यावर मौन का धारण केले आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सरकारमध्ये विदर्भातील मोठे मंत्री असतानादेखील डोळ्यांदेखत नागपूरवरील अन्याय होत असल्याची बाब निश्चितच दुर्दैवी असल्याची जनभावना आहे.
कोरोनामुळे नागपुरात २०२० चे हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते. त्यानंतर २०२१ मधील एखादे अधिवेशन होईल, अशी अपेक्षा होती; मात्र असे काहीच झाले नाही. मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनातच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आता कोरोनाच्या नावाखाली परत अधिवेशन मुंबईतच घेण्यात येणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे मंत्री विदर्भातील आहेत. असे असतानादेखील विदर्भात अधिवेशन घ्यावे, अशी आग्रही भूमिका या नेत्यांना मांडता आली नाही. विशेष म्हणजे अधिवेशनाबाबत घोषणा झाल्यानंतर एकानेही यावर भाष्य केलेले नाही. विदर्भातील अनुशेष, येथील प्रलंबित समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यावर नागपुरातील अधिवेशनातच योग्य चर्चा होऊ शकते याची या नेत्यांना जाण असतानादेखील त्यांनी सरकारदरबारी आग्रही भूमिका का घेतली नाही व त्यांची प्रादेशिक अस्मिता भाषणांपुरतीच असते का, असे सवाल विदर्भवाद्यांकडून उपस्थित होत आहेत.
नागपूर कराराचा उघडपणे भंग
राज्यकर्त्यांनी आजपर्यंत विदर्भावर अन्यायच केला. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर कराराचा उघडपणे भंग करून नागपुरात अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारला विदर्भातील समस्या दिसताच की नाही, हा प्रश्नच आहे. आता सरकारने विदर्भात येऊच नये. येथे अधिवेशन घेऊदेखील नका, आम्हाला वेगळा विदर्भ द्या.
- वामनराव चटप, ज्येष्ठ विदर्भवादी नेते
सरकारला विदर्भातील लोक आपले वाटतच नाहीत
कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांना विदर्भाशी काहीच घेणेदेणे नाही. त्यांच्यासाठी मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हेच भाग महत्त्वाचे आहेत. नागपुरात अधिवेशन झाले तर येथील समस्यांवर उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी विदर्भाकडे परत एकदा पाठ फिरविण्यात आली आहे.
- प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप
मंत्र्यांना विदर्भ नव्हे, स्वत:चे पद महत्त्वाचे
नागपुरात मागील दोन वर्षांपासून अधिवेशनाचे एकही सत्र घेण्यात आलेले नाही हा विदर्भाचा अपमान आहे. कोरोनाचा संसर्गदेखील घटला आहे. विदर्भातील मंत्री स्वार्थी असून, मंत्रिमंडळातील स्थान टिकविण्यासाठी ते मौन बाळगून आहेत. त्यांना विदर्भापेक्षा स्वत:चे पद महत्त्वाचे आहे.
- कृष्णा खोपडे, भाजप आमदार