तक्रारकर्त्यांची संख्या तोकडी : हजारो गुंतवणूकदार उदासीन नागपूर : आयुष्यभर जोडलेली रक्कम झटक्यात गमावून बसलेले हजारो गुंतवणूकदार पोलिसांकडे तक्रारी द्यायला तयार नाहीत. हजारो पीडित गुंतवणूकदारांनी साधलेली चुप्पी पोलिसांना खटकत आहे. पीडित गुंतवणूकदारांच्या उदासीनतेचा फायदा ठगबाज प्रशांत वासनकर आणि त्याच्या साथीदारांना मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. ९ मे रोजी वासनकर अॅन्ड कंपनीवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून वासनकर बाहेर राहिला तरच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील, असा भ्रामक प्रचार वासनकरांच्या चेल्याचपाट्यांनी चालविला होता. त्याला जर पोलिसांनी अटक केली तर तुमचे पैसे परत मिळणार नाही, अशी भीती दाखवून पीडित गुंतवणूकदारांना पोलिसांकडे जाण्यापासून रोखण्यात वासनकर आणि त्याच्या कंपनीचे दलाल आतापावेतो यशस्वी झाले. त्यामुळे पाचशे कोटींपेक्षा जास्त रक्कम गिळंकृत करणाऱ्या वासनकरच्या विरोधात तक्रारी करणाऱ्यांची संख्या तोकडी होती. मात्र, आता महाठग वासनकर आणि त्याचा भाऊ तसेच साळ्याला अटक होऊन तीन दिवस झाले. या फसवणूक प्रकरणातील आणखीही अनेक जणांना लवकरच अटक होणार आहे. ४८ तास, ७ तक्रारीठगबाज वासनकरला पोलिसांनी अटक करून आता ४८ तास झाले. या कालावधीत किमान ४८० तक्रारकर्ते गुन्हेशाखेत पोहचतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. अटक झाल्याचे वृत्त वाचून शेकडो पीडित गुंतवणूकदार वासनकरचे निवासस्थान, कार्यालय आणि कोर्टाच्या परिसरात पोहचले. प्रत्यक्ष त्याच्याविरुद्ध तक्रारी करण्याची तसदी मात्र पीडित गुंतवणूकदार घ्यायला तयार नाहीत. रविवारी आणि सोमवारी एकही तक्रारकर्ता गुन्हेशाखेत किंवा पोलीस ठाण्यात आला नाही. आज केवळ सात तक्रारकर्ते गुन्हेशाखेत पोहचले. त्यामुळे पोलीसही अस्वस्थ आहेत. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जास्तीत जास्त पीडित गुंतवणूकदारांनी तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे यावे, असे आवाहन पोलीस अधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)' चेलेचपाटे सक्रियतक्रारकर्त्यांनी पोलिसांकडे पोहचू नये म्हणून अजूनही वासनकराचे चेलेचपाटे सक्रिय आहेत. पीडित गुंतवणूकदारांची दिशाभूल करून ते त्यांना रोखत असल्याची चर्चा आहे. या चेल्याचपाट्यांनी केवळ गुंतवणूकदारच नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही भेट घेण्याचे धाडस चालविले आहे. ज्या दिवशी ठगबाज वासनकरला पोलिसांनी अटक केली. त्याच दिवशी सायंकाळी वासनकर किती चांगला आहे, हे सांगण्यासाठी त्याचे चेलेचपाटे वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोहचले. खोटेनाटे वृत्त छापू नका, अशीही मखलाशी त्यांनी केली. वासनकरकडून लाखो रुपये कमिशन हडपणारे काही जण गुन्हेशाखेच्या आसपासही घुटमळत आहे. वासनकर लवकर बाहेर येणार असून लगेच गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाणार असल्याचे ते सांगत आहेत. जे तक्रार करतील त्यांचे पैसे मात्र परत मिळणार नसल्याचेही ते सांगत आहेत. असा मिळेल फायदातक्रार करणारांची एकूण रक्कम आणि वासनकर अॅन्ड कंपनीने हडपलेल्या रकमेचा आकडा प्रचंड तफावत दाखविणारा आहे. त्यात पोलिसांनी ठेवलेल्या आकड्याची आणि तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या रकमेतही मोठी तफावत आहे. त्यामुळे वासनकरच्यावतीने युक्तिवाद करताना या बाबीचा लाभ उठवला जाऊ शकतो. प्रत्यक्षात आपल्याकडे ‘एवढीच‘ रक्कम गुंतवणूकदारांनी दिली अन् ती वापस करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगून वासनकर आणि त्याचे साथीदार आपली मानगूट सोडवू शकतात.
ठगबाज वासनकरच्या पीडितांची चुप्पी
By admin | Published: July 30, 2014 1:14 AM