लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही उपक्रम हे हेतूपुरस्सर पार पाडले जातात. कारण एकच, समाजाने प्रेरणा घ्यावी. गणमान्यांनी पुढाकार घेतला की समाजही आपली उदारता दाखवतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्याच शृंखलेत आज पार पडलेल्या विवाह सोहळ्याचा समावेश करावा लागेल. हा आनंदाचा क्षण होता, दोन मनांच्या रेशीमगाठी जोडल्या गेल्या आणि त्याला सामाजिक ऋणानुबंधाची जोडही होती. ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी जोडताना भरभक्कम सामाजिक उदारता दिसून आली.
ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वर्षा आणि मानसपुत्र समीर यांचा शुभविवाह रविवारी पोलीस लाईन टाकळी येथील सद्भावना लॉनमध्ये पार पडला. दोघेही दिव्यांग आहेत. वधूचे पालकत्त्व गृहमंत्री अनिल व आरती देशमुख यांनी तर वराचे पालकत्त्व जिल्हाधिकारी रवींद्र व ज्योत्सना ठाकरे यांनी स्वीकारले. जणू हा सोहळा देशमुख आणि ठाकरे घराण्यातील आहे, अशीच तयारी दोन्ही कुटुंबीयांची होती. अगदी वर-वधूचे आगमन ते वधूची वरघरी होणारी बिदाईपर्यंतच्या सोहळ्यात दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. वधूचे कन्यादान करताना देशमुख कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव संवेदनेचे होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, खा. कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त विनिता शाहू, आ. विकास ठाकरे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, समाजसेवक गिरीश गांधी, माजी मंत्री अनिस अहमद, रणजित देशमुख, रमेश बंग, सतीश चतुर्वेदी, माजी खा. दत्ता मेघे, समाजसेविका सीमा साखरे, विष्णू मनोहर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष माधुरी तिडके-वैद्य, सलिल देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून वधू-वरास आशीर्वाद दिले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दिले आशीर्वाद
विवाह सोहळ्याचे यजमान असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्वत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रीय विवाह महोत्सवाचे आमंत्रण दिले. नवदाम्पत्यांना आपले आशीर्वाद देण्याची आग्रही विनंती यावेळी त्यांनी केली. विनंतीला मान देत भागवत यांनी दिलेल्या निश्चित वेळेत सोहळ्यास हजेरी लावली आणि समीर व वर्षा यांना शुभाशीर्वाद दिले.
तत्त्वाप्रमाणे शंकरबाबा नव्हते
कुठलेही व्यासपीठ नको, कुठलीही प्रसिद्धी नको या तत्त्वाला जागत शंकरबाबा पापळकर ऐन वेळी सोहळ्यातून अदृष्य झाले. त्यांना अनिल देशमुख यांनी व्यासपीठावर पाचारण केले. मात्र, ते त्यांच्या तत्त्वाला जागत बाहेर पडले होते.