नागपूर : जागतिक बाजारात सोने-चांदीच्या बाजारात जबरदस्त तेजी बघायला मिळत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. चांदीची एक लाख रुपयांकडे वाटचाल सुरू असून मे महिन्यात केवळ १८ दिवसांत ३ टक्के जीएसटीएसह शुद्ध चांदीचे प्रतिकिलो भाव ९,३७३ रुपयांची वाढून ९३,४२१ रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या दरानंतरही ग्राहकांची खरेदीही वाढतच असल्याचे सराफांचे मत आहे.
महागाईचा वाढता दबाव आणि सर्वच औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढल्यामुळे चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन वर्षांत औद्योगिक क्षेत्रात चांदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. परिणामी चांदीच्या भावात हळूहळू वाढ होऊ लागली. मे महिन्याच्या दरवाढीचा आढावा घेतल्यास १ मे रोजी चांदीचे भाव जीएसटीविना ८१,९०० रुपयांवर स्थिर होते. ४ मेपर्यंत ८०,६०० रुपयांपर्यंत कमी झाले. त्यानंतर ६ मे रोजी ८२,३०० रुपयांवर गेले. ८ मेपर्यंत भाव ८२,५०० रुपयांवर स्थिर होते. मात्र ९ मे रोजी ८०० रुपयांनी वाढून ८३,३०० रुपयांवर पोहोचले. १० मे रोजी तब्बल २ हजार रुपयांची वाढ होऊन भाव ८५,३०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर ११, १२, १३ आणि १४ मे रोजी भाव ८५ हजारांखाली अर्थात ८४,९०० पर्यंत कमी झाले. १५ मे रोजी ४०० रुपयांनी वाढून ८५,३०० रुपयांवर गेले. १६ मे रोजी चांदीत १,५०० रुपयांची वाढ झाली. १७ मे रोजी भाव तब्बल २२०० रुपयांवर वाढून ८९ हजारांवर पोहोचले. तर १८ मे रोजी पुन्हा १,७०० रुपयांची वाढ होऊन ३ टक्के जीएसटीसह प्रतिकिलो भावपातळी ९३,४२१ रुपयांवर पोहोचली. चांदी एक लाख रुपयांचे भाव किती दिवसांत गाठते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुद्ध चांदीचे दर :मे महिना प्रतिकिलो भाव१ मे ८१,६००६ मे ८२,२००९ मे ८३,३००१० मे ८५,३००१३ मे ८४,८००१५ मे ८५,३००१६ मे ८६,८००१७ मे ८९,०००१८ मे ९०,७००(उपरोक्त भावावर ३ टक्के जीएसटी वेगळा)