लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखेर नागपूर शहरात पेट्रोलचे दराने प्रति लिटर शंभरीपार केली आहे. शनिवारी पेट्रोल पंपावर पेट्रोल १००.०२ रुपये आणि डिझेलची ९०.६७ रुपये प्रति लिटर दराने विक्री होणार आहे.
शुक्रवारी मध्यरात्री तेल कंपन्यांनी शनिवारचे दर जाहीर करताना पेट्रोलमध्ये २३ पैसे आणि डिझेलची २९ पैसे वाढ केली.
शुक्रवारी पेट्रोलचे दर ९९.७९ रुपये आणि डिझेल ९०.३८ रुपये लिटर होते, अशी माहिती विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी लोकमतला दिली.
कोरोना महामारीच्या काळात गेल्या एक वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढले आहे. पेट्रोलमध्ये २३.२१ रुपये आणि डिझेलचे दर २३.०१ रुपये लिटरने वाढले आहेत. २९ मे २०२० ला पेट्रोल ७६.८१ रुपये आणि डिझेल ६६.७६ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल पंपावर विकले होते. सामान्यत: कोणत्याही वस्तूची मागणी वाढल्यानंतर त्या वस्तूंचे दर वाढतात. वर्षभरात लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधानंतर एकीकडे वाहनांची वाहतूक कमी झाली तर दुसरीकडे पेट्रोल पंपावर इंधनाची विक्रीही कमी झाली. त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहनचालक आणि माल वाहतूकदारांना फटका बसला आहे.
एक वर्षात असे वाढले दर :
इंधन २९ मे २०२० २९ मे २०२१
पेट्रोल ७६.८१ १००.०२
डिझेल ६६.७६ ९०.६७