चार आरोपी गजाआड : शेतात पुरलेली तोफ आंतरराष्ट्रीय बाजारात विकणार होतेसिंदखेडराजा (बुलडाणा) : माँ जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तु संग्रहालयातून चोरी झालेली ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ पोलिसांनी शोधली असून, ही तोफ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याची तयारी आरोपींनी चालविली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून पुरातन वस्तू खरेदी-विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.बुलडाणा जिल्ह्यातील आडगावराजा येथील भुईकोट किल्ल्याचे २० वर्षापूर्वी उत्खनन केले असता, तेथील १३ एकर परिसरात पंचधातूच्या आठ तोफा सापडल्या होत्या. या तोफा सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील शासकीय वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ २२ डिसेंबर रोजी रात्री चोरी झाली होती. ही तोफ चोरण्याचा कट मुख्य आरोपी बाळू म्हस्के याने रचला होता. निमगाव वायाळ येथील ट्रॅक्टर चालक आकाश पंजाबराव निलक, दुसरबीड येथील शंकर शिवाजी केवट आणि बाळू म्हस्केचा सख्खा भाचा सिद्धार्थ काळे हेदेखील कटात सहभागी होती. या आरोपींनी १९ डिसेंबर रोजी राजवाड्यात जाऊन तोफ चोरीची रंगीत तालीमही केली होती. २२ डिसेंबर रोजी तिघे पुन्हा एकत्र आले आणि नियोजित कटानुसार रात्री १२.३० वाजता राजवाडयातून तोफ लंपास केली. त्यानंतर ही तोफ त्यांनी शिवणीटाका रोडवरील नगरपालिका हद्दीतील एका शेतात पुरून ठेवली. त्यासाठी केलेले खोदकाम कुणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी तोफ पुरलेल्या जागेवर सोयाबीनचे कुटार जाळले; मात्र पोलिसांनी ट्रॅक्टरच्या चाकाच्या खुणांचा मागोवा घेत शेतातील जागेचा शोध लावला. त्या जागेवर खोदकाम केले असता, पोलिसांना तोफ सापडली.पोलिसांनी शिताफीने तपासचक्र फिरवून, मुख्य आरोपी बाळू जगन्नाथ म्हस्के, निमगाव वायाळ येथील ट्रॅक्टरचालक आकाश संजाबराव निकाळजे, दुसरबीड येथील शंकर शिवाजी केवट या तिघांना अटक केली असून बुधवारी दूपारी २ वाजता अटक केली. चौथा आरोपी सिद्धार्थ काळे याला रात्री ८ वाजता अटक केली. आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय बाजारात तोफेची किंमत ५० लाख रूपयेराजवाड्यातून चोरलेली तोफ १६ व्या शतकातील होती. तिची किंमत पुरातत्व विभागाचे अभिरक्षक एम.वाय. कामठे यांनी केवळ ४५०० रुपये काढली होती. प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तिची किंमत ५० लाख रूपयांपेक्षाही जास्त असल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू म्हस्के याने कटात सहभागी इतर आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी पाच लाख रूपये कबूल केले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी बाळू म्हस्के याने वापरलेल्या नेटवर्कचा शोध आता पोलीस घेत आहेत.
सिंदखेडराजाची ऐतिहासिक तोफ सापडली
By admin | Published: December 26, 2014 12:45 AM