नागपूर : माणूस येतो आणि जातो. तो लक्षात राहतो, त्याच्या कर्तृत्वाने आणि गोड अशा अविस्मरणीय प्रसंगांनी. के. के. अर्थात कृष्णकुमार कुन्नथ या लोकप्रिय पार्श्वगायकाने ‘लोकमत’चा ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा २०१६’ आपल्या सांगीतिक उपस्थितीने संस्मरणीय करून सोडला.
२२ मार्च २०१६ रोजी हा सोहळा विभागीय क्रीडासंकुल, मानकापूर येथील इनडोअर स्टेडिअममध्ये रंगला होता. या सोहळ्यात युवा गायिका अंकिता जोशी व युवा बासरीवादक आकाश सतीश यांना पुरस्कृत करण्यात आले होते. पुरस्कार वितरणानंतर के.के.चा लाईव्ह इन कॉन्सर्ट पार पडला. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील स्वत: गायलेले ‘तडप तडप के इस दिल से आह निकली रही’ हे लोकप्रिय गाणे सादर करीत त्याने युवा रसिकांना हर्षोल्हसित केले होते. या वेळी त्याने मस्तभऱ्या अंदाजात... क्यूं आजकल निंद कम, ख्वाब ज्यादा है, दिल इबादत कर रहा है, तुझे सोचता हूँ मैं शामो, ऐ बेखबर मेरा दिल तेरे प्यार में आह भरे, अभी अभी तुम मिले, अभी ना करो रुठने की बात, जी हमदम सुनियो रे, आवारापन बंजारापन, मैं हूँ डॉन, हैं जुनू, आशाए, खुदा जाने क्यूँ ए खुदा, जरासी दिल में दे जगह तू... आदी गाणी सादर करीत उपस्थितांना नाचण्यास भाग पाडले होते. या वेळी त्याने सादर केलेले ‘हम रहे या ना रहे कल, याद आयेंगे ये पल’ हे गाणे सादर केले होते. आज के.के.ने घेतलेल्या अचानक एक्झिटमुळे, ते गाणे प्रसंगानुरूप वास्तवदर्शी ठरत आहे.
के.के. ने बॉलिवूडला दिली अनेक सुरेल गाणी
दिवंगत गायक के.के. अर्थात कृष्णकुमार कुन्नथ आज या जगात नाही. परंतु, त्याने गायलेल्या अनेक सुपरहिट गाण्यांनी तो कायम चित्रपट व संगीत रसिकांच्या मनात राहणार आहे. त्याने एकापेक्षा एक सुरेल गाणी गायली. त्यातील काही लोकप्रिय गाणी...
पल, याद आएंगे ये पल...
पहिला अल्बम ‘पल’ नंतर के.के.साठी बॉलिवूडचे दार मोकळे झाले होते. या गाण्याचे लेखनही के.के.नेच केले होते आणि प्रितम यांनी संगीतबद्ध केले होते. कोलकाता येथे झालेल्या त्याच्या शेवटच्या परफॉर्मन्समध्येही के.के. ने हे गाणे सादर केले होते.
तड़प तड़प के इस दिल से...
सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण अभिनित ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून के.के.ला पहिला सिंगिंग ब्रेक मिळाला होता. या गाण्यामुळे के.के. प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यापूर्वी, त्याने ‘माचिस’ या चित्रपटातील ‘छोड़ आए हम वो गलियां’ या गाण्यातील दोन ओळींना आवाज दिला होता. ‘तड़प तड़प’ हे गाणेच त्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरले. याच गाण्यासाठी त्याला बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून फिल्मफेयर अवॉर्ड मध्ये नॉमिनेशन मिळाले होते.
आंखों में तेरी अजब सी...
२००८ मध्ये आलेल्या ‘ओम शांति ओम’ मधील हे गाणे संगीत रसिकांच्या मनावर कोरले गेले. के.के. ने गायलेले हे गाणे दीपिका पादुकोण व शाहरुख खान यांच्यावर चित्रित झाले होते.
जरा सी दिल में दे जगह तू...
भट्ट कंपनीच्या २००८ मध्ये आलेल्या ‘जन्नत’ चित्रपटातील हे गाणे के.के.च्या मोस्ट पॉप्युलर गाण्यांपैकी एक आहे. इमरान हाश्मी व सोनल चौहान यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने म्युझिक इंडस्ट्री मध्ये एक विक्रम स्थापित केला होता. या गाण्याला यूट्यूब वर ६ कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.
खुदा जाने...
रणबीर कपूर व दीपिका पादुकोण यांच्या ‘बचना ऐ हसीनों’ या चित्रपटातील हा एक रोमँटिक ट्रॅक आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक दिवसपर्यंत हे गाणे पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. याच गाण्याने के.के. ला बेस्ट प्लेबॅक सिंगरचा फिल्मफेयर अवॉर्ड मिळवून दिला होता.
के.के.ची अन्य लोकप्रिय गाणी
- बर्दाश्त नहीं कर सकता (चित्रपट- हमराज, २००३)
- दस बहाने करके ले गई दिल (चित्रपट- दस, २००६)
- तू ही मेरी शब है (चित्रपट- गँगस्टर- २००७)
- जिंदगी दो पल की (चित्रपट -काईट्स - २०११)
- आवारापन बंजारापन (चित्रपट - जिस्म)
- तूने मारी एंट्री (चित्रपट - गुंडे)
- तू जो मिला (चित्रपट - बजरंगी भाईजान)