लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवानाच्या अर्जात बदल केला आहे. पूर्वी शिकाऊ (लर्निंग), पक्के (परमनंट) व दुय्यम (ड्युप्लिकेट) परवानासाठी वेगवेगळा अर्ज भरुन द्यावा लागायचा आता एकाच अर्जात या सर्वबाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आल्याने आॅनलाईन अर्ज भरणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. नवीन अर्जात अर्जदाराला आपला आधारकार्डही जोडावा लागणार आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘वाहन ४.०’ आणि ‘सारथी ४.०’ या अद्ययावत प्रणालींचा अंतर्भाव करण्यात आला. यातील परवानासाठी असलेली ‘वाहन ४.०’ ही प्रणाली किचकट असल्याने आजही ७५ टक्के उमेदवारांना दलालांकडून, खासगी आॅन लाईन केंद्र किंवा नेट कॅफेकडून प्रति अर्ज १०० रुपये देऊन अर्ज भरावा लागत आहे. यातही अर्जाला लागणारे आवश्यक दस्तावेज ‘स्कॅन’ करून तो ‘डाऊनलोड’ करण्यासाठी व ‘आॅनलाईन पेमेंट’ करण्यासाठी वेगळे ५० रुपये द्यावे लागत आहे. साधारण एका परवानामागे अर्जदाराला २०० ते ५०० रुपयांचा भूर्दंड पडत आहे. यातच १ एप्रिलपासून नवा अर्ज आल्याने गोंधळात भर पडल्याचे चित्र आहे.असा आहे नवा अर्जशिकाऊ परवाना अर्ज नमुना क्र. १, पक्का परवना अर्ज नमुना क्र. २ यांच्यासह दुय्यम परवाना, पत्त्यातील बदल आदींसाठी करावे लागणारे वेगवेगळे अर्ज आता एकत्र करुन नवीन अर्ज तयार केला आहे. हा अर्ज ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ घेतांना भरावयाचा आहे. पाच पानाच्यावर असलेला हा अर्ज किचकट आहे. अर्ज भरताना मागितलेली माहिती नेमकी कोणती, हा प्रश्न निर्माण होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.आधार कार्ड सक्तीचेजुन्या अर्जात आधार कार्डची सक्तीचे नव्हते. जन्मतारखेचा पुरवा व पत्त्याचा पुरावा दिला तरीही चालत होते. आता या सर्व पुराव्यासोबतच आधार कार्ड जोडावे लागणार आहे. त्याशिवाय अर्ज पूर्ण होणार नाही. आधार नसलेल्यांना वाहन परवाना काढता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.‘नॉन ट्रान्सपोर्ट’ परवानासाठीही वैद्यकीय प्रमाणपत्रपूर्वी नॉन ‘नॉन ट्रान्सपोर्ट’ परवानासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत नव्हते, परंतु नवीन अर्जात वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, परवाना हरविला असेल तर पोलीस तक्रारीची प्रतही जोडावी लागणार आहे.