मंगेश तलमले
लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : दाेन दिवस काेसळलेल्या संतत व मुसळधार पावसामुळे सूर नदीला बुधवारी (दि. १८) पूर आला आणि या पुराने नदीकाठचे इंदाेरा (ता. माैदा) येथील स्मशानभूमीतील दहन शेड काेसळले व पुरासाेबत वाहून गेले. या प्रकारामुळे अंत्यसंस्काराची समस्या ऐरणीवर आली आहे.
इंदाेरा येथील नागरिक पूर्वीपासून अंत्यसंस्कार सूर नदीच्या तीरावर करायचे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांनी त्यांनी याच नदीच्या काठावर शेडची निर्मिती केली. त्यासाठी सिमेंट काॅंक्रिटे काॅलम व चबुतराही तयार करण्यात आला हाेता. त्यामुळे ग्रामस्थांची साेय झाली हाेती.
या नवीन शेडची निर्मिती मागच्या वर्षी करण्यात आली असून, त्यावर पाच लाख रुपयांचा खर्च करण्यात आला हाेता, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वर्षभरातच शेड वाहून गेल्याचे त्याचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे करण्यात आले, असा आराेपही त्यांनी केला असून, कंत्राटदार व अभियंत्याकडून बांधकामाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गुरुवारी (दि. १९) सकाळी त्या काेल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमध्ये अडकलेला कचरा जेसीबीच्या मदतीने काढायला सुरुवात केली हाेती. दुसरीकडे, अंत्यसंसकराची समस्या साेडविण्यासाठी शासनाने गावात नवीन शेड तयार करून द्यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
...
बंधाऱ्यातील कचऱ्याने केला घात
सूर नदीवर या स्मशानभूमीपासून १५० मीटरवर काेल्हापुरी बंधारा आहे. या बंधाऱ्याच्या गेटमध्ये कचरा अडकला आणि नदीतील पाण्याच्या प्रवाहाने थाेडा मार्ग बदलला. हा प्रवाह स्मशानभूमीच्या दिशेने आला आणि त्यात नदीकाठचे जुने व नवीन असे दाेन्ही दहन शेड काेसळले व वाहून गेले. बंधाऱ्याचे गेट वेळीच साफ केले असते तर हा प्रकार घडला नसता, असेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले.
...
११ गावांमधील शेड संकटात
सूर नदीच्या काठावर माैदा तालुक्यातील अराेली, काेदामेंढी, भांडेवाडी, सावंगी, इंदाेरा, बाेरी, इजनी, माेरगाव, तांडा, पिंपळगाव व महालगाव या ११ गावांमधील स्मशानभूमी शेड आहेत. पिंपळगाव येथील शेडच्या पायव्याजवळील रेती वाहून गेली आहे. भविष्यात मुसळधार पाऊस काेसळल्यास व सूर नदीला पूर आल्यास याही गावांमधील दहन शेडला धाेका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
...
नदीला पूर आला हाेता. बंधाऱ्यात कचरा अडकल्याने पाण्याने प्रवाह बदलला. प्रवाह वेगात असल्याने स्मशानभूमीतील दाेन्ही शेड वाहून गेले. अंत्यसंस्काराची समस्या निर्माण झाल्याने शासनाने नवीन शेड तयार करून द्यावे.
- वीरेंद्रसिंग सेंगर,
उपसरपंच, इंदाेरा