निशांत वानखेडे
नागपूर : राजस्थानच्या बिकानेरमधील अत्यंत धनिक डागा कुटुंबाला सात पिढ्यांपर्यंत दानशूरतेचे व संपन्नतेचे वरदान मिळाले हाेते. याच कुटुंबातील यशस्वी व्यवसायी रायबहादूर अमीरचंद व भाऊ रामरतन यांना पुत्रलाभ मिळाला नाही. सेठ अमीरचंद यांच्या पंडितांनी एका मुलाची जन्मपत्री त्यांच्यासमाेर ठेवली. अमीरचंद यांनी लाभदास नामक या मुलाला दत्तक घेतले व त्याचे ‘कस्तुरचंद’ असे नामकरण केले. याच दत्तक पुत्राने पुढे पित्यासह डागा कुटुंबाचे नाव आणि त्यांचा व्यवसायही जगभर पसरविला. हेच आहेत ‘सर कस्तुरचंद डागा.’
सर कस्तुरचंद यांच्या मृत्यूला आता शतकाहून अधिक काळ लाेटला आहे, पण त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. व्यवसायासोबतच डागा कुटुंबाच्या दानशूरतेच्या परंपरेचाही नावलाैकीक वाढविला. सर डागा यांचे पणतू गाेविंददास डागा यांनी ‘लोकमत’शी बोलताना, पणजाेबांच्या गुणवत्तेचा अभिमान व्यक्त केला. सेठ अमीरचंद यांचे निधन झाले, तेव्हा कस्तुरचंद अवघ्या २४ वर्षांचे हाेते. या वयात कुटुंब आणि व्यवसायाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी यशस्वितेचा नवा इतिहासच घडविला. बॅंकिंग आणि धान्याच्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘रायबहादूर बन्सीलाल अमीरचंद’ म्हणजे ‘आरबीबीए’ या फर्मचा सर कस्तुरचंद यांनी काेळसा, मॅंगनीज मायनिंग, जिनिंग प्रेसिंग, टेक्सटाइल, जमीनदारीच्या क्षेत्रापर्यंत विस्तार केला. दिल्ली, मुंबई, काेलकाता, चेन्नईपासून रंगून, काबूल, लाहाेर, चीनपर्यंत १२० शाखांनी वाढविला.
एटीएमची संकल्पना यापेक्षा वेगळी नाही
सण १८०० च्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, संचार आणि दळणवळणाची साधने नसताना बॅंकिंगच्या क्षेत्रात डागा यांच्या आरबीबीए फर्मने काळापुढचे आयाम दिले. आरबीबीएच्या देशातील कुठल्याही शाखेत पैसे जमा केल्यावर देशातूनच नव्हे, तर काबूल, लाहाेर, चीन या कुठूनही काढण्याची व्यवस्था सुरू केली हाेती. ही एकप्रकारे आधुनिक एटीएमचीच संकल्पना हाेती.
विदर्भात अनेक व्यवसायांची पायाभरणी
- बल्लारपूर, चंद्रपूरपर्यंत अनेक ठिकाणी काेळशाच्या खाणी सुरू केल्या.
- रामटेक, बालाघाट, चारगावसह काही ठिकाणी मॅंगनीजची मायनिंग
- नागपूरमधल्या माॅडेल मिलसह हिंगणघाट, बडनेरा आदी ठिकाणी टेक्सटाइल मिल. अनेक गावांत जिनिंग प्रेसिंग मिल.
- मुलींच्या शिक्षणासाठी एलएडी काॅलेची स्थापना. महिला व मुलांच्या आराेग्यासाठी डागा हाॅस्पिटलची मुहूर्तमेढ.
दानवीरतेचे नवे आयाम
- कस्तुरचंद पार्क, संत्रा मार्केट, टाउन हाॅल, डागा हाॅस्पिटल, धर्मशाळा, कामठीत पाेलीस स्टेशन अशा अनेक कामासाठी जमिनी दान.
- विदर्भासह देशभरात मंदिरांची निर्मिती व प्रसिद्ध धर्मस्थळी धर्मशाळा.
- शाळा, रुग्णालये निर्मितीसाठी त्या काळी लाखाे रुपये दान.