आयएएस व्हीजनने नेटवर्क उभारले कमलेश वानखेडे - नागपूरकाट्याच्या लढतीची अपेक्षा असलेली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाली. भाजपचे उमेदवार ‘प्राध्यापक’ अनिल सोले यांनी काँग्रेसचे ‘प्राचार्य’ डॉ. बबनराव तायवाडेंचा पराभव केला तर फुले शाहू आंबेडकरी संघटनेकडून रिंगणात उतरलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी ‘आयएएस’चे व्हीजन वापरून नेटवर्क उभारले व दलित, बहुजन मतदार स्वत:कडे वळविण्यात यश मिळविले. सोलेंनी गडकरींची गादी राखत वारसा मिळविला तर तायवाडेंचा ‘सेकंड अटेम्ट’ही फेल ठरला. सात वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले तायवाडे व सात महिन्यांपूर्वी पदार्पण करणारे गजभिये यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी काट्याची लढत झाली. गडकरींनी वर्षभरापूर्वी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर पदवीधर मतदारसंघात त्यांचा वारसदार कोण, अशी एकच चर्चा राजकीय वर्तुळात होती. गडकरींची जागा असल्यामुळे ही जागा कुठल्याही परिस्थितीत पक्षाला गमवायची नव्हती. त्यामुळे पक्षाने उमेदवार निश्चित करताना घाई केली नाही. लोकसभेच्या निकालानंतर नागपूरचे महापौर अनिल सोले यांची उमेदवारी जाहीर केली. प्रचारासाठी दिवस कमी होते पण गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय असल्याने सोले सर्वांना परिचित होते.नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये भाजप नेते, कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यकर्ते एका-एका मतदारांकडे यादी घेऊन फिरताना दिसत होते. माजी खा. दत्ता मेघे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर मेघे समर्थकांनी सोले यांना पाठबळ दिले. सोले यांनी महापौर म्हणून पूल, इमारती उभारल्या नाहीत, मात्र, वृक्षारोपण, नागनदी, पिवळीनदी माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा सेतू उभारला. हेच त्यांच्या कामी आले. सोलेंच्या उमेदवारीमुळे भाजपमधील बरेच इच्छुक नाराज झाले.सोले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पक्षाप्रतिची निष्ठा सोडली नाही. त्यामुळे विजयाची घागर काठोकाठ भरली.
सर जिंकले, प्राचार्य हरले !
By admin | Published: June 25, 2014 1:16 AM