नागपूर : कोरोना नियंत्रणात आला असताना नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर सिरो सर्वेक्षणाचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणात ६ हजार लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. पुढील ८ ते १० दिवसात हा अहवाल मेडिकलकडून विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा विषाणूने हाहाकार उडवला होता. या विषाणूचे रुग्ण कमी होत नाहीत तोच आता ‘ओमायक्रॉन’मुळे भीतीचे वातावरण तयार झाले. या व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्येच ३० म्युटेशन्स आहेत. यामुळे या व्हेरिएंटवर कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रभाव कमी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्वेक्षणात किती नागरिकांमध्ये त्यांच्यात न कळत कोरोना होऊन गेला, त्याचा हा अहवाल उपयोगी ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिल्या सिरो सर्वेक्षणात ४ हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. आता दुसऱ्या सर्वेक्षणात ६ हजार लोक सहभागी करून घेण्यात आले. यात महानगरपालिकेच्या हद्दीत १० वेगवेगळ्या झोनमधील प्रत्येकी ४ वॉर्डातील ७५ ते ८० असे एकूण ३ हजार लोकांचे रक्ताचे नमुने, तर ग्रामीणमधील १३ तालुक्यांमधून प्रत्येकी १ मुख्यालय व २ गावातून एकूण ३ हजार नमुने गोळा करण्यात आले.
सर्वेक्षणात ६४० मुलांचा समावेश
सिरो सर्वेक्षणात शहर आणि ग्रामीणमधील ६ ते १० वयोगटातील ६४०, ११ ते १७ वयोगटातील १२८०, तर १८ व त्या पुढील वयोगटातील ४०८० लोकांचा समावेश आहे.
अहवालात काय दडलंय!
मेडिकलच्या पीएसएम विभागाचे प्रमुख व सिरो सर्वेक्षणाची जबाबदारी असलेले डॉ. उदय नारलावार म्हणाले, सिरो सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील ८ ते १० दिवसात यावरील निष्कर्षाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाईल.