नागपूर : ९ ऑगस्टपर्यंत विदर्भ राज्य निर्मितीची घोषणा करा अन्यथा ९ ऑगस्टपासून नागपुरात बेमुदत ठिय्या आंदोलन व विदर्भभर भाजपा सरकार चले जाव आंदोलन सुरू करण्याचा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिला आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ९ ऑगस्ट या क्रांती दिवसापासून नागपूरच्या शहीद चौकात बेमुदत ठिय्या आंदोलनाची घोषणा विदर्भवाद्यांनी केली आहे. त्यासाठी नागपूर शहरात कॉर्नर सभा, बैठकांचे नियोजन आहे. विदर्भभर जिल्हा व तालुका स्तरावर बैठका होत आहेत. १२ जुलैला नागपुरात पहिली कार्यकर्त्यांची सभा चिटणीस वाड्याजवळ झाली. यात विदर्भ आंदोलनाचे नेते राम नेवले यांनी मार्गदर्शन केले. नागपूरला होणाऱ्या वीज व विदर्भासाठी बेमुदत ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनीही मार्गदर्शन केले. शहर महासचिव नरेश निमजे यांनी प्रास्ताविक केले. कोर कमेटी सदस्या सुनिता येळणे, झोपडपट्टी विभाग महिला आघाडी शहर अध्यक्ष ज्योती खांडेकर, शहर महिला आघाडी उपाध्यक्ष वीणा भोयर, व्यापारी आघाडी मध्य नागपूर अध्यक्ष रवींद्र भामोळे यांचीही भाषणे झाली.