नरेश डोंगरे
नागपूर : राज्य परिवहन विभागात (आरटीओ) बदलीचे रॅकेट चालवून कोट्यवधींची हेरफेर करण्याच्या संशयास्पद प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित करताच सरकारकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणी कसून चाैकशी करण्याचे आदेश उच्च पातळीवरून परिवहन विभाग आणि पोलिसांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी आरटीओतील बदली रॅकेटची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून अत्यंत जलदगतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीओत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
राज्य परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया पुढच्या काही दिवसांत पार पडणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची फ्रँचाइजी मिळविल्याच्या थाटात खाडे-पवार नावाची व्यक्ती पुण्यातून नागपुरात आली. त्यांनी नागपूर शहर, जिल्हा तसेच गोंदिया, भंडारा येथील बदलीपात्र १८ अधिकाऱ्यांना भेटीसाठी सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये येण्याचा निरोप दिला. येथे बदलीबाबतची डील होत असल्याची कुणकुण लागल्याने काही पत्रकार तेथे पोहोचले. त्यामुळे बदली प्रक्रियेसंदर्भात भेटीगाठी करणारांनी तेथून पलायन केले. या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करणारी वृत्तमालिका ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांपासून चालवली. बदलीच्या संबंधाने झालेले संभाषणही (ऑडिओ क्लिप) शब्दश: प्रकाशित केले. त्याची सरकारने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शीर्षस्थ अधिकाऱ्यांना बोलवून आरटीओतील बदलीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश शुक्रवारी रात्री दिले. दुसरीकडे, पोलिसांनाही या प्रकरणाची चाैकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे नागपूर पोलिस दलातील क्राइम ब्रांच, ईओडब्ल्यू आणि सायबर पोलिसांचा समावेश असलेले विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. अत्यंत जलदगतीने संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याने एसआयटीने हॉटेल सेंटर पॉइंटमधील आठ सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये दिसणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी काहींना शनिवारी पोलिस आयुक्तालयात बोलवून त्यांची चाैकशी करण्यात आली. बुधवारी खाडे-पवारची भेट घेण्यासाठी जे अधिकारी गेले होते, त्या सर्वांचीच चाैकशी होणार असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता असल्यामुळे संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिस आयुक्त म्हणतात...
यासंबंधाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता ते म्हणाले, “हॉटेलमधील आठ सीसीटीव्हींचे दहा-दहा तासांचे फुटेज जप्त करण्यात आले. तसेच आज काही अधिकाऱ्यांनाही यासंबंधाने चाैकशीसाठी बोलविण्यात आले आहे.” प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न असून, युद्धपातळीवर आम्ही कसून तपास करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.
परिवहन आयुक्त म्हणतात...
या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यापुढे आरटीओतील संपूर्ण बदली प्रक्रिया पारदर्शी (ऑनलाइन) पद्धतीने राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याशिवाय नागपुरात झालेल्या प्रकाराशी संबंधित असलेल्यांचीही आम्ही चाैकशी करणार आहोत, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी आज ‘लोकमत’ला दिली.