नागपूर : जर तुम्ही तासनतास सलग बसून काम करीत असाल तर हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. अधिक वेळ बसण्याची सवय हृदयासंबंधित आजारांना आमंत्रण देते. जर तुम्हालाही घरात किंवा ऑफिसमध्ये सुमारे चार तास बसून काढत असाल, तर तुम्हालाही हृदयविकार होण्याचा अधिक धोका संभवतो. सलग चार तास बसणे सिगारेट ओढण्याइतकेच धोक्याचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या अभ्यासामधून हे समोर आले आहे. यात जे लोक दिवसभर बसून जास्त वेळ घालवतात, अशा लोकांमध्ये मृत्यूचे आणि हृदयविकाराचे प्रमाण जगातील सामान्य लोकांपेक्षा अधिक आढळून येते.
-हृदयविकाराचे वय झाले कमी
अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, उच्च ट्रायग्लिसराइड, धूम्रपान, कमी एचडीएल व पोटाचा लठ्ठपणा ही हृदयविकारामागील कारणे आहेत. पूर्वी हे आजार साठीनंतर दिसून यायचे. परंतु, आता ३५ वयोगटातही दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
-सलग बसून काम करणे धोक्याचे
सलग बसून राहिल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. वाढत्या वयानुसार बसण्याचे वाईट परिणामही वाढतात. याचा अधिक त्रास स्त्रियांपेक्षा पुरुषांना होतो. यावर उपाय म्हणून ऑफिसमध्ये उभं राहून मीटिंग घेण्याचा प्रयत्न करावा. फोनवर बोलत असताना चालत राहायला हवे. त्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते. हृदय आणि मन दोन्ही निरोगी राहते.
-हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका
तासनतास एकाच ठिकाणी बसून राहिल्याने त्याचा परिणाम मेंदूपासून पायावर होतो. जेव्हा आपण बसतो, रक्त अधिक हळूहळू वाहते आणि स्नायू कमी चरबी जाळते. ‘अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नल’मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, ज्या स्त्रिया दररोज १० तासांपेक्षा जास्त वेळ बसतात, त्यांना पाच तासांपेक्षा जास्त वेळ न बसणाऱ्याच्या तुलनेत हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होण्याचा धोका वाढतो.
-काय काळजी घ्या
स्वत:साठी एक नियम तयार करायला हवा. आपल्या कामाच्या जागेवरून दर अर्ध्या तासाला १ ते २ मिनिटांसाठी, तर दर दोन तासांनी १० ते १५ मिनिटांसाठी उठा आणि फक्त उठू नका, तर सक्रिया रहा, हालचाल करा, किमान चाला.
-हायरिस्क लोकांनी काळजी घ्यायला हवी
ज्यांना हृदयविकार, इतरही गंभीर आजार आहेत, वृद्ध आहेत, अशा लोकांनी एकाच ठिकाणी बसून राहू नये. यामुळे पायात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्या हृदयापर्यंत पोहोचून जिवाला धोका होण्याची शक्यता वाढते. विशेषत: ‘ट्रॅव्हल्स’ करताना याकडे लक्ष द्यायला हवे. हायरिस्क रुग्णांनी व इतरांनीही सक्रिय राहायला हवे.
-डॉ. निकुंज पवार, हृदयशल्यचिकित्सक
-पायातील गुठळी फुप्फुसामध्ये गेल्याने मृत्यू
एकाच ठिकणी तासनतास बसून राहिल्याने एका रुग्णाच्या पायात रक्ताची गुठळी तयार होऊन ती फुप्फुसात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण पाहण्यात आले. एकाच ठिकाणी बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढून इतर गंभीर आजार होण्याचाही धोका वाढतो.
-डॉ. प्रशांत जगताप, हृदयचिकित्सक