सुमेध वाघमारे
नागपूर : भारतीयांना हृदयविकाराची अधिक जोखिम असल्याने त्यांनी संतुलित आहार व योग्य जीवनशैलीचा अवलंब करून हृदयरोगाचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आहारात डबाबंद पदार्थ व अतिसारखेचे सेवन टाळायला हवे. तासनतास एकाच ठिकाणी बसून राहिल्यास हृदयरोग होण्याचा धोका धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीएवढा असतो, हे निरीक्षण हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी नोंदविले आहे.
जागतिक हृदयरोग दिवस म्हणून २९ सप्टेंबर पाळला जातो. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. बीडकर म्हणाले, गेल्या दशकात एखाद दुसरा चाळीशीतील व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात यायचा. मात्र, गेल्या दहा वर्षात हृदयरोगात प्रचंड वाढ झाली आहे. आजची धकाधकीची जीवनशैली, अनियंत्रित मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासह अधिक वेळ बसून राहण्याच्या सवयीमुळे हृदयरोग वाढत आहे.
-हार्ट अटॅकची शंभरातील ३० रुग्ण हे ४० वयाखालील
हल्ली हृदयविकाराच्या झटक्याचे (हार्ट अटॅक) शंभरातील ३० रुग्ण हे ४० वयाखालील असल्याचे निरीक्षण डॉ. बीडकर यांनी नोंदविले. ते म्हणाले, भारतात दर ३३ सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावतो. शिवाय मधूमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत व प्रत्येक मधुमेह रुग्ण हृदयविकाराने ग्रस्त असल्याचे गृहित धरल्या जाते.
- पाश्चिमात्यांच्या तुलनेत भारतीयांच्या रक्तवाहीन्या छोट्या
भारतीयांना नैसर्गिकरीत्याच हृदयविकाराची जोखिम असते; कारण आपल्या रक्तवाहिन्यांचा आकार पाश्चिमात्यांच्या तुलनेत छोटा आहे. शिवाय हृदयाच्या एकाहून अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचे प्रमाणही अधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे, वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण झालेली स्पर्धा, ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि प्रदुषण देखील हृदयविकाराला पुरक ठरत आहेत.
- यामुळे वाढते जोखिम
* अनियंत्रित मधूमेह* अनियंत्रित रक्तदाब* बैठी जीवनशैली* व्यायामाचा अभाव* लठ्ठपणा* कोलेस्ट्रॉलचे प्रमाण* धुम्रपान
- नियमित व्यायामाने जोखिम कमी
रोज पंधरा मिनिटे व्यायाम केला तरी हृदयविकाराची जोखिम १४ टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे व्यायाम हा जीवनशैलीचा भाग करणे आवश्यक आहे. सोबत आहार नियंत्रित ठेवला तर हृदयरोग निश्चित टाळता येतो.
- डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ, नागपूर