लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीबाग, नंगा पुतळा चौकात रविवारी रात्री एका दाबेली विक्रेत्यावर खुनीहल्ला करून दहशत पसरविणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन आरोपींचा शोध सुरू आहे.अमित गजानन उगले (२०) रा. वाठोडा, सुरेंद्र ऊर्फ गोलू साहेबराव मस्के (२२) रा. सतनामीनगर, आकाश विलास लांजेवार (१९) रा. भांडेवाडी बीडगाव, रौनक दिलीप ठवरे (२१) सतनामीनगर, यश नारायण गोस्वामी (१८) सतनामीनगर, सचिन मितेंद्र सोळंकी (२२) रा. बाबुलवन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनुसार रविवारी रात्री ८ वाजता गांधीबाग येथील रहिवासी नरेश अशोक तिवारी (४०) आपल्या दाबेलीच्या ठेल्यावर उभा होता. त्यावेळी अमित आणि सुरेंद्र दोघांनीही नरेशच्या ठेल्यासमोर बाईक उभी केली होती. तेव्हा नरेशने त्यांना ठेल्यासमोर बाईक उभी करण्यास मनाई केली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपींनी आपल्या मित्रांना बोलावून घेतले. ते सर्व शस्त्र घेऊन आले. त्यांनी नरेशवर हल्ला केला. त्याला चाकू मारून जखमी केले. तसेच शेजारचा पावभाजी विक्रेता रामनिवास शर्मा याच्या ठेल्याचीही तोडफोड केली. गंभीर जखमी झालेल्या नरेशला उपचारासाठी मेयोमध्ये भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. ठाणेदार अजयकुमार मालवीय यांनी तातडीने आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यानंतर इतर आरोपींचाही शोध लागला. रात्री उशिरापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली.
नागपुरात दाबेली विक्रेत्यावर खुनी हल्ला, सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 11:22 PM