लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ओरिएंटा सुसुगुमाशी’ हा जीवाणू चावल्याने व त्याची लाळ शरीरात गेल्याने होणारा ‘स्क्रब टायफस’हा आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. एकट्या मेडिकलमध्ये १ ते १४ वयोगटातील सहा मुले बालरोगाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या रोगाने आणखी एका मृत्यूची नोंद झाली असून रविवारी पुन्हा दोन नव्या रुग्णाची भर पडली आहे. अमोल मंडल (३६) रा. गडचिरोली असे मृताचे नाव आहे.विदर्भासह मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येत आहे. कडक उन पडल्यावर हा रोग कमी होईल, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहे. परंतु तूर्तास तरी तसे चित्र नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी, मध्य प्रदेश सिवनी येथील ६० वर्षीय पुरुष तर वर्धा येथील २५ वर्षीय महिलेला हा रोग असल्याचे निदान झाले. यामुळे आता रुग्णांची संख्या ९५वर गेली आहे. शुक्रवारी मध्यरात्री उपचार घेत असताना अमोल मंडल याचा मृत्यू झाल्याने बळीची संख्या १६ वर पोहचली आहे.
तरुणांमध्ये स्क्रब टायफस सर्वाधिकआतापर्यंत आढळून आलेल्या स्क्रब टायफसच्या ९५ रुग्णांमध्ये सर्वाधिक ५२ रुग्ण हे तरुण असल्याचे समोर आले आहे. १५ ते ३० वयोगटात १२ पुरुष व १३ महिलांची नोंद झाली आहे. तर ३१ ते ४५ या वयोगटात ११ पुरुष व १६ महिला आढळून आल्या आहेत. या तुलनेत ४६ ते ६० व त्यावरील वयोगटातील रुग्णांमध्ये आतापर्यंत ३८ रुग्णांची नोंद झाली आहे.