नागपूर : म्हैसूर दीप परफ्युमरी हाऊस (एमडीपीएस) कंपनीच्या पथकाने दिल्ली न्यायालयाच्या आदेशावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करून नागपुरातील एका गृह उद्योग कंपनीच्या गोदामावर कारवाई केली. येथून कंपनीच्या ब्रँडचे पॅकिंग असलेली अगरबत्ती व धूप असा सहा कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी दुपारी तीन वाजता वाडी परिसरात करण्यात आली.
कंपनीचे संचालक अंकित अग्रवाल यांनी सांगितले की, देशभरात अनेक बोगस व्यापारी आपल्या कंपनीचा माल ब्रँडेड कंपनीचा लोगो लावून विक्री करीत आहेत. या प्रकारचा बनावटपणा गुजरात, उडिसा, पाटणा व नागपुरातील काही व्यावसायिक करीत असल्याचे कंपनीच्या लक्षात आले होते. त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाच्या आदेशानंतर टप्प्याटप्प्याने कारवाई करीत बोगसपणा करणाऱ्या व्यावसायिकाच्या गोदामावर कारवाई करून माल जप्त करण्यात येत आहे. सोमवारी नागपुरातील वाडी परिसरातील गृह उद्योग कंपनीच्या दोन गोदामांवर कारवाई करण्यात आली. तेथून सहा कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
- न्यायालयाचा आदेश असल्याने केले सहकार्य
वाडीच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या की, कंपनी न्यायालयाचा आदेश असल्याने आम्ही कंपनीला मदत केली. त्यानंतर कंपनीच्या पथकाने गृह उद्योगाच्या गोदामातून माल जप्त करून कारवाई केली.