लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : घराकडे परत येत असलेल्या कळपातील सहा शेळ्यांचा वाटेत पडलेल्या वीजप्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून सहाही शेळ्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. यात ३६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेळीपालकाने दिली. ही घटना पारडी (ता. कुही) शिवारात साेमवारी (दि. ६) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
मेंढपाळ स्वत:च्या गावातील इतरांच्या एकूण चार खंड्या शेळ्या राेज चारायला नेताे. सायंकाळ झाल्याने ताे कळप घेऊन घराच्या दिशेने निघाला हाेता. त्यातच घर्षणामुळे विजेच्या तारा तुटल्या व त्या रवींद्र गेडेकर यांच्या शेतालगतच्या रस्त्यावर पडल्या. या प्रवाहित तारांबाबत मेंढपाळाला काहीही माहिती नव्हती. काही शेळ्यांनी जिवंत तार सुरक्षितपणे ओलांडली. मात्र, सहा शेळ्यांचा त्या तारेला स्पर्श झाला व त्यांना विजेचा जाेरात धक्का लागला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मृत शेळ्यांमध्ये शंकर नाकाडे, दिवाकर नाकाडे, राजू नंदापुरे व केवळ घुबडे यांच्या प्रत्येकी एक, तर गजानन नाकाडे यांच्या दोन शेळ्या आहेत. यात ३६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधितांनी दिली. माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तारांमधील वीजप्रवाह बंंद केला. महावितरण कंपनीने या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधिताना ३६ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी उपसरपंच नरेश शुक्ला, संदीप खानोरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.