नागपूर : सराफा व्यापारी केतन कामदार (वय ४८) यांच्यावर भल्या मोठ्या चाकूचे भररस्त्यावर घाव घालून त्यांना लुटण्याच्या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. त्यापैकी मुख्य आरोपी अजय उर्फ बिट्टू राम समशेरिया (वय १९), अनिकेत उर्फ अन्नू मनोज बरोंडे आणि अंकित हरिराम बिरहा (वय १९, सर्व रा. ठक्करग्राम पाचपावली) हे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
केतन कामदार यांचे इतवारीतील सराफा गल्लीत दुकान आहे. त्यामुळे सराफा कारागीर असलेले आरोपी प्रज्वल राजू विजयकर, त्याचा भाऊ श्रेयस आणि कैलास राजूसिंग ठाकूर या तिघांशी त्यांचा नियमित संपर्क यायचा. कामदार सोन्याचे ठोक व्यापारी असल्याचे आणि ते रोज लाखो-करोडोंचा व्यवहार करीत असल्याचे विजयकर बंधू आणि ठाकूरला माहिती होते. दुसरीकडे मुख्य आरोपी समशेरिया याच्याशीही त्यांची ओळख होती. राजकीय पांघरूण घेऊन गुन्हेगारांशी त्याची जवळीक असल्याचे माहिती असल्याने कामदार यांची टीप विजयकर आणि ठाकूरने त्यांना दिली होती. सोन्याचा बराचसा व्यवहार ‘ब्लॅक’मध्ये होतो. त्यामुळे त्यांना लुटले तरी ते पोलिसांकडे जाणार नाही अन् हा माल सहजपणे पचविता येईल, असे आरोपींना वाटत होते. त्यामुळे त्यांनी कामदार यांना लुटण्यासाठी ४० ते ४५ दिवसांपासून तयारी केली होती.
सहा महिने संपर्कात राहायचे नाही
आरोपी समशेरिया हा खतरनाक गुन्हेगार अभय हजारे याचा फॉलोअर आहे. बहुचर्चित बाल्या बिनेकर हत्याकांडाचा हजारे मुख्य सूत्रधार आहे. सध्या तो अकोला कारागृहात आहे. गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून त्याने फूल प्रूफ प्लॅन बनविला होता. कामदार यांना लुटल्यानंतर आपले सर्वांचे मोबाईल बंद करायचे. एकमेकांसोबत सहा महिने संपर्कातच यायचे नाही. त्यानंतर आपण इन्स्टाग्रामवर नवीन अकाउंट तयार करू अन् संपर्कात येऊ. त्यानंतरच लुटलेल्या मालाची हिस्सेवाटणी करू, त्याने सर्व साथीदारांना सांगितले होते.
जबलपूरला पळून जाण्याचे ठरले
आरोपींपैकी एकाच्या जबलपूरमधील नातेवाईकाकडे या दोन दिवसांत लग्न होते. त्यामुळे तेथे जायचे अन् तेथून प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी सहा महिने टाइमपास करायचा, असे ठरले होते.
सोने कोण घेणार?
एका सराफा व्यापाऱ्याने लुटलेले सोने विकत घेतल्याने पोलिसांनी त्यालाही मोक्काचा आरोपी बनविले आहे. त्यामुळे चोरी अथवा लुटमारीचे सोने घेण्याची हिम्मत नागपुरातील व्यापारी करीत नाही. परिणामी कामदार यांच्याकडून लुटलेले सोने कुणाकडे विकायचे? असा प्रश्न आरोपींना सतावत होता. त्यासाठी त्यांनी गुन्हा करण्यापूर्वीच चोरीचे सोने कोण विकत घेतो, ते जाणून घेण्यासाठी आपल्या मित्रांमार्फत अनेकांकडे विचारणा करून ठेवली होती, असेही तपासात उघड झाले आहे.