काटोल : शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील राठी लेआऊट भागात सहा ठिकाणी हात साफ करीत अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. चोरट्यांनी सुरुवातीला संतोष भैस्वार रा. राठी लेआऊट, काटोल यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्यांच्या शयनकक्षातील कपाट फोडले. येथून चोरांनी सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी व सहा हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या दागिन्यांची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर चोरांनी भैस्वार यांच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या इंदू राऊत यांच्या घरात प्रवेश केला. येथून त्यांनी सोन्याची पोत आणि १३०० रुपये रोख असा एकूण ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला. पुढे चोरांनी त्यांचा मोर्चा याच भागातील पंकज नत्थूजी महंत राठी यांच्या घराकडे वळविला. येथे त्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकत रोख रक्कम व दागिने हुडकले. सुदैवाने महंत यांच्या घरी काहीही लागले नाही. पुढे त्यांनी राऊत यांच्या घरी किरायाने राहणाऱ्या नंदकिशोर मासूरकर यांच्या घराला लक्ष्य केले. त्यानंतर अनुप पाटील यांच्याही घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मासूरकर व पाटील यांच्या घरी चोरांच्या हाती काहीही लागले नाही. याप्रकरणी काटोल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
काटोलमध्ये सहा घरफोड्या
By admin | Published: June 24, 2015 3:26 AM