नागपूर : मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमरत गावात ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने एक महिला, दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतकांमध्ये आई आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे. सर्व मृतक नागपुरातील टेका नाका भागातील रहिवासी आहेत.
मृतकांमध्ये मयूरी राजू ढोके (१६), माही राजू ढोेके (१४), राजू यांची पत्नी निशा ढोके (३८) , प्रिंस बघेल (१५), राहुल आणि दिव्या यांचा समावेश आहे. तर नीलेश रामलखन आणि रमजान दीन मोहम्मद या दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर आरोपी चालक फरार झाला. शहर वाहतूक उपअधीक्षक (डीएसपी) सुदेश सिंह यांनी सांगितले, कारमध्ये आठ जण होते. सर्व पीडित कारने नागपुरातून छिंदवाडा जिल्ह्यातील उमरत येथे जात होते. बुधवारी रात्री रिंग रोडवर कारला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील चार जणांचा घटनास्थळी तर एका जखमी महिलेचा (३८) छिंदवाडा येथील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तसेच ४५ वर्षीय गंभीर जखमी कारचालकाचा नागपुरातील रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. ट्रकच्या जबरदस्त धडकेमुळे कार रिंग रोडलगतच्या नाल्यात पडली.
अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहे. आरोपी चालकाला अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सिंह म्हणाले.