खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. ११) रात्री केलेल्या कारवाईमध्ये अट्टल वाहन चाेरट्यास अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या सहा माेटारसायकली जप्त करण्यात आल्या, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
प्रणय धनराज पाटील (वय २३, रा. माॅयल काॅलनी, गुमगाव, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे. जिल्ह्यात वाहन चाेरीचे प्रमाण वाढताच स्थानिक गुन्हे शाखेचे या घटनांच्या समांतर तपासाला सुरुवात केली. प्रणय हा वेगवेगळी दुचाकी वाहने वापरत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला त्याच्या घरून ताब्यात घेतले व त्याच्याकडे असलेल्या (एमएच-४०/क्यू-२६२८)माेटारसायकबाबत विचारपूस केली. त्याने या माेटारसायकलच्या कागदपत्रांबाबत असंबद्ध उत्तरे दिली. पाेलिसांनी त्या माेटारसायकलच्या चेसिस व इंजिन क्रमांकाची माहिती मिळविली.
त्या माेटरसायकलचा मूळ क्रमांक एमएच-४०/बीडब्ल्यू-८५४३ असल्याचे क्राईम रिपाेर्टवरून स्पष्ट झाले. प्रणयने ती माेटारसायकल चाेरून आणल्याचे उघड हाेता. पाेलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या क्रमांकाच्या सहा माेटारसायकली जप्त केल्या. जप्त केलेल्या माेटारसायकलींची एकूण किंमत ३ लाख ९० हजार रुपये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली असून, प्रणयकडून वाहन व इतर चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, हवालदार ज्ञानेश्वर राऊत, दिनेश आधापुरे, राजेंद्र रेवतकर, अमाेल वाघ, विपीन गायधने, राेहण डाखाेरे, नम्रता बघेल यांच्या पथकाने केली.
...
खापरखेडा, पाटणसावंगी परिसरात केला हात साफ
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आराेपी प्रणय पाटील याच्याकडून एमएच-४०/बीएक्स-६२०१, एमएच-४०/बीटी-८५२१, एमएच-४०/डब्ल्यू-३१०७, एमएच-४०/क्यू-२६२८, एमएच-४०/क्यू-२६२८, एमएच-४०/एए-२२३३ क्रमांकाच्या सहा माेटारसायकली जप्त केल्या. त्याने या माेटारसायकली सावनेर तालुक्यातील खापरखेडा, पाटणसावंगी, खापा, भेंडाळा येथून चाेरून नेल्याचे, तसेच सध्या त्याला सावनेर पाेलिसांच्या ताब्यात दिल्याचे अनिल जिट्टावार यांनी सांगितले.