नागपूर : मायनसमध्ये तापमान असलेल्या हिमाचल प्रदेशच्या ‘स्पिती व्हॅली’चा हिवाळ्यात प्रवास करणे माेठे आव्हान असते. मात्र, नागपूरच्या सहा तरुणांनी हे आव्हान स्वीकारून यशस्वीपणे पूर्णही केले. या तरुणांनी माेटारसायकलने उणे ३० अंश तापमान असलेल्या स्पिती व्हॅलीच्या काजापर्यंत ‘ग्रुप स्पिती राइड’ पूर्ण केले. हे यश मिळविणारी ती नागपूरची पहिली टीम ठरली आहे.
मुलगी वाचवा मुलगी शिकवा आणि कॅन्सरमुक्त भारताचा संदेश देत, नागपूरचे सहा तरुण हिमाचलकडे निघाले. कॅन्सरतज्ज्ञ डॉ.नम्रता सिंह, राहुल बोरेले, चेतन कडू, ऋषभ अग्रवाल, मंथन पटले आणि अपूर्व नायक असे हे सहा तरुण. त्यांनी ‘ग्रुप विंटर स्पिती राइड’मध्ये सहभाग घेतला. खरं तर हिवाळ्याच्या काळात हा प्रवास अतिशय आव्हानात्मक असते. कारण तापमान मायनस ३० पर्यंत गेलेले असते. मात्र, या तरुणांनी आव्हान स्वीकारले.
नागपूरपासून ४,५०० किलाेमीटरचा हा बाइक प्रवास आहे. दिवस-रात्र गाडी चालवत ते नागपूरहून दिल्ली, दिल्लीहून शिमला व पुढे काजा पाेहोचले. जगातील उंच स्थळांपैकी असलेल्या काॅमिक गावापर्यंत ते मुलगी शिकविण्याचा संदेश देण्यासाठी पाेहोचले. दरम्यान, त्यांनी मार्गामध्ये अनेक गावांत जनजागृती सेमिनारचे आयाेजनही केले. हाडे गाेठविणाऱ्या कडाक्याच्या थंडीत त्यांनी हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला व नुकतेच ते नागपूरला पाेहोचले. या टीमने यापूर्वीही ४ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले आहेत.