नागपूर : सरते वर्षे कोरोनामय ठरले. यामुळे मेडिकलला वैद्यकीय सेवेत नवे काही करता आले नाही. मात्र, नवीन वर्षात नव्या रुग्णसेवा सुरू करण्याची संकल्पना मेडिकलने हाती घेतली आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी रुग्णालयाला मिळणाऱ्या २१ कोटी रुपयांमधून सहा नवे प्रकल्प उभे करणार आहे. यात सहा कोटी रुपयांची कॅथलॅब, ९५ लाख रुपयांचे ‘आयव्हीएफ सेंटर’, २५ लाखांची मिल्क बँक, एक कोटी रुपयांची ‘बोन बँक’, ७२ लाखांची मॉलिक्युलर लॅब व दोन कोटी रुपयांची ‘स्किल लॅब’ आदींचा समावेश असणार आहे.
मार्च महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) कोरोनाबाधितांच्या सेवेत आहे. संपूर्ण यंत्रणा यात सहभागी असल्याने वर्षभरात प्रशासनाला वेगळे काही करता आले नाही. मात्र नव्या वर्षात नवे प्रकल्प मेडिकल प्रशासनाने हाती घेतले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. मित्रा म्हणाले, मेडिकलच्या विविध प्रकल्पासाठी १२ कोटी तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रकल्पासाठी नऊ कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामुळे नव्या वर्षात रुग्णहिताचे अनेक नवे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
-‘ह्युमन मिल्क बँक’
आईच्या दुधाला वंचित राहिलेल्या बाळाला वरचे दूध म्हणून गाई-म्हशीचे दूध किंवा पावडरचे दूध दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. अशा बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मानवी दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. ही ‘बँक’ आता स्वत: मेडिकलच्या पुढाकारात होणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
-‘सुपर’मध्ये नवी कॅथलॅब
डॉ. मित्रा म्हणाले, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ६ कोटी १५ लाख रुपये खर्चून नवी कॅथलॅब उभारण्यात येईल. सध्या एका कॅथलॅबमुळे रोज १० ते १५ अॅन्जिओग्राफी आणि २ अॅन्जिओप्लास्टी होत आहेत. त्यात नव्या कॅथलॅबमुळे दुपटीने वाढ होईल. विशेष म्हणजे, येथे आकस्मिक विभागही सुरू केला जाईल.
- वंध्यत्व निवारण केंद्राचा रुग्णाला फायदा
कृत्रिम गर्भधारणेने मूल जन्माला घालण्याची सोय मेडिकलमध्ये सुरू होणार आहे. स्त्रीरोग व प्रसूती विभागात ‘इन व्रिटो गर्भधारणा’ (आयव्हीएफ) ही वंध्यत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पद्धती सुरू होणार आहे. यासाठी ९५ लाख रुपयांची तरतूद केल्याचे डॉ. मित्रा यांनी सांगितले.
- राज्यातील पहिला उपक्रम ‘बोन बँक’
कर्करोगामुळे हाडाची झीज झाल्याने किंवा एखाद्या अपघातात हाड तुटल्याने अपंगत्व येते. यासाठी ‘ब्रेन डेड’ रुग्णांकडून मिळणाऱ्या हाडांसाठी ‘बोन बँक’ तयार केली जाणार आहे. यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
-कर्करोगाच्या रुग्णांसाठी मॉलिक्युलर लॅब
कर्करोगाच्या रुग्णांना देण्यात येत असलेल्या किमोथेरपीचा प्रभाव पाहण्यासाठी ‘मॉलिक्युलर लॅब’ तयार केली जाणार आहे. यासाठी पॅथालॉजीच्या एका डॉक्टरने नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या ‘लॅब’साठी ७० लाख रुपये दिले जाईल.
-विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘स्किल लॅब’
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्य व अनुभवांचाही विकास व्हावा, याकरिता कौशल्यावर(स्किल)आधारित प्रयोगशाळा मेडिकलमध्ये सुरू होणार आहे. यासाठी ‘ऑर्थाेपेडिक’, ‘गायनेकोलॉजी’ व ‘जनरल सर्जरी’ विषयातील ‘सिम्युलेटर’ उपकरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या स्किल लॅबच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वादोन कोटी उपलब्ध केले जाणार आहे.
- सहा महिन्यात नवे प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न
नव्या वर्षात हाती घेण्यात आलेल्या नव्या प्रकल्पाला वैद्यकीय शिक्षण विभागाची हिरवी झेंडी मिळाली आहे. काही प्रकल्पाच्या यंत्रसामुग्रीच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. साधारण पुढील दोन महिन्यात खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिन्यात त्याची स्थापना होईल. साधारण सहा महिन्यात नवे प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न राहील.
- डॉ. सजल मित्रा
अधिष्ठाता, मेडिकल