नरेश डोंगरेनागपूर : हंगामभर कबाडकष्ट करावे अन् चार पैसे गाठीशी बांधून आपल्या गावाकडे परत जावे, अशी अनेक प्रांतातील मजुरांची पद्धत असते. याऊलट एक प्रांत बुकींचाही आहे. या प्रांतातील बुकी आयपीएलच्या हंगामात लगवाडी - खयवाडी करतात आणि कोट्यवधींची हारजित तसेच माैजमजा केल्यानंतर आपल्या शहरात परतात. आज असेच काही बड्या बुकींचे हस्तक गोव्याहून नागपूरात परतले. त्यातील एकाचीच टीप असल्याने पोलिसांनी त्याला पकडले. सहा जण मात्र पोलिसांची नजर चुकवून डोक्यावर पाय घेऊन पळून गेले.
प्रकरण शेकडो कोटींच्या क्रिकेट बेटिंगमधील दुवा असलेला कुख्यात बुकी आणि कालूचा साथीदार कुणाल सचदेव याच्याशी संबंधित आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे क्रिकेट सट्ट्याचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरात डझनभर मोठे बुकी आहेत. प्रत्येक आयपीएलच्या सिझनमध्ये यातील एकेक बुकी शंभरपासून पाचशे कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल करतो. प्रारंभी हे बुकी आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचे रस्तोगी, कोचर सारखे गुर्गे यांच्याशी कनेक्ट असलेल्या दुबई आणि गोव्यातील बुकींकडे खायवाडी केलेल्या क्रिकेट सट्ट्याच्या रकमेची कटिंग (उतराई) करायचे. नंतर त्यांची थेट लाईन जुळली, अशात नागपूर पोलिसांनी त्यांच्यावर सतत नजर ठेवल्याने ही बुकी थेट गोव्यातच बसून बेटिंग करू लागली.
गेल्या पाच वर्षांपासून शहरातील सर्वच बडे बुकी आपल्या 'दिवानजी'ना गोव्यात पाठवितात आणि तेथूनच क्रिकेट सट्ट्याचे बुक चालवितात. मंगळवारी पहाटे आयपीएलचा हंगाम संपला. त्यानंतर कोट्यवधींची हारजीत, लगवाडी-खयवाडी असा हिशेब मोबाईल, पेनड्राईव्ह, लॅपटॉपमध्ये घेऊन बडे बुकी आणि त्यांचे दिवानजी गोव्याहून कुणी मुंबई, कुणी दिल्ली तर कुुणी दुसऱ्या महानगरात जाण्यासाठी विमानात बसले आणि तेथून ते लगेच दुसऱ्या फ्लाईटने नागपूरकडे परतले. यातील कुणाल सचदेवची टीप पोलिसांना होती. त्यामुळे विमानतळ परिसरात तो नजरेस पडताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. खास सूत्रांच्या माहितीनुसार, कुणालसोबत काही बुकी अन् काही दिवानजी असे एकूण सात जण होते. मात्र, पोलिसांना त्यांची खबरबात नसल्याने ते तेथून सटकले. दरम्यान, कुणालसोबत आणखी सहा जण असल्याची बातमी रात्री बुकीबाजारातून सर्वत्र चर्चेला आल्याने शहरातील बुकींच्या नेटवर्कमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
नागपुरात शिरले अन् ...
सूत्रांच्या माहितीनुसार, कुणालसोबतग असलेल्या बाकी बुकीं-दिवानजीकडे कोट्यवधींच्या हिशेबाचा डाटा असलेला पेन ड्राईव्ह होता. कुणालला पोलिसांनी पकडल्याचे लक्षात येताच ते सहा जण नागपुरात तर शिरले मात्र लगेच नागपूरबाहेर पळूनही गेले. या संबंधाने कुणालकडे पोलीस रात्रभरात विचारपूस करणार आहेत.----