आशिष दुबे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत शुक्रवारी (दि. १) पेपर लीक हाेण्याचा नवा विक्रम स्थापित हाेत आहे. शहरातील एका परीक्षा केंद्रावर इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या एक-दाेन नव्हे सहा प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. परीक्षा सुरू हाेण्याच्या दहा मिनिटांपूर्वीच परीक्षा विभागाला याबाबत माहिती मिळाली, ज्यानंतर प्रश्नपत्रिका रद्द करून नवीन प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. या गाेंधळात निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा पेपर सुरू झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार हे प्रकरण प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आहे. महाविद्यालयात सहाव्या सेमिस्टरचे २५०० विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने येथे हाेम सेंटर दिले आहे. सर्व शाखेच्या सहाव्या सेमिस्टरचा आज पेपर हाेता. मात्र परीक्षा सुरू हाेण्याच्या तासाभरापूर्वीच प्रश्नपत्रिका साेशल मीडियावर व्हायरल झाली व विद्यार्थ्यांच्या हाती लागली. पेपर लीक झाल्याची माहिती परीक्षा विभागाला पेपर सुरू हाेण्याच्या काही वेळा आधी प्राप्त झाली. सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळताच विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डाॅ. प्रफुल्ल साबळे अधिकाऱ्यांसह महाविद्यालयात पाेहोचले व त्यांनी काॅलेजचे प्राचार्य डाॅ. श्रीकृष्ण ढाले यांना पेपर रद्द करण्याची सूचना दिली. साेबतच नवीन प्रश्नपत्रिका काॅलेजला देण्यात आली.
दरम्यान, प्रश्नपत्रिका कशी काय फुटली, हे स्पष्ट हाेऊ शकले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार काॅलेजच्या एका व्यक्तीने प्रश्नपत्रिका फाेडली आहे. विद्यापीठाकडून हाेम सेंटर असलेल्या महाविद्यालयांना ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविली जाते. साेबतच केवळ काॅलेजच्या प्राचार्यांना आयडी आणि पासवर्ड दिला जाताे. प्राचार्य परीक्षा कार्यासंबंधी व्यक्तीला हे आयडी आणि पासवर्ड देतात. याबाबत माहितीसाठी डाॅ. साबळे यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.
पाेलिसांत तक्रार दाखल करणार
याबाबत काॅलेजचे प्राचार्य डाॅ. श्रीकृष्ण ढाले यांच्याशी संपर्क केला असता काॅलेजमध्ये एकच पेपर लीक झाल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात दाेषी आढळलेल्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल व पाेलिसांत तक्रारही दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.