लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने इंटरनेटवर अवैधरित्या ई-तिकीट काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या सहा दलालांविरुद्ध कारवाई केली आहे.
स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या संयुक्त अभियानात नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथील विविध प्रतिष्ठानांवर धाडी टाकून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त अरुण कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ ठाणे आणि गुन्हे शाखेच्या चमूने पार पाडली. यात मोतीबाग आरपीएफ ठाण्यांतर्गत यशोधरानगरच्या मो. नौशाद मो. सादिक आणि सरदारबादच्या मो. सलीम मो. जाकिर हुसैन यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २३ तिकिटांसह ९९ हजार ५४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतवारी ठाण्यांतर्गत लकडगंजच्या संदेश शिखरचंद जैन आणि चंद्रमणीनगरच्या रक्षक गणेश मेश्राम यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२ तिकिटांसह ४१ हजार ११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा आरपीएफ ठाण्यांतर्गत मौदाच्या रोशन हटवार यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५ तिकिटांसह २० हजार ३४६ रुपये तसेच गोंदिया आरपीएफ ठाण्यांतर्गत रावणथडी गोंदियाच्या सचिन देवधारी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून १८ तिकिटांसह ५३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.