वर्धा : शहरातील बजाज चौकात असलेल्या मुख्य भाजीबाजारात सोमवारच्या रात्री भुरट्या चोरांनी प्रवेश करीत भाजीपाला विक्रीची सहा दुकाने फोडून रोख रकमेसह डिजिटल वजनकाटे असा एकूण ७५ हजार रुपयांची रक्कम व इतर साहित्य चोरुन नेल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उजेडात आली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
शहरातील बजाज चौकात मुख्य भाजीबाजार भरतो. मात्र, सध्या हा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात स्थलांतरित केल्याने काही किरकोळ भाजीविक्रेत्यांची या बाजारात दुकाने आहेत. सोमवारी भाजीबाजार बंद असल्याने रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी भाजीबाजारात प्रवेश करुन आलू कांद्याचे व्यावसायिक महंमद शफी चौधरी यांच्या दुकानातील टिव्ही सेट, इलेक्ट्राॅनिक्स वजन काटा व गल्यातील २५०० रुपये, किशोर सोनकर यांच्या दुकानातील वजन काटा, ७०० रुपये, लहसून कट्टा, रमेश कडू यांच्या दुकानातील ४ वजन काटे, ५०० रुपये रोख, तर त्याच दुकानात ठेवलेला नरेश हरणे यांचा १ वजन काटा, मंगेश सोनकर यांच्या दुकानातील वजन काटा आणि ५८०० रुपये रोख, नवीन पिशव्या, दोन पोती अगरबत्ती पाकिट, विजय सोनकर यांच्या दुकानातील वजन काटा, २ हजार रुपये रोख, राजू गोलाईत यांच्या दुकानातील नविन पिशव्या,२०० रुपये चिल्लर, असा एकूण अंदाजे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.याबाबतची सामुहिक तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.