नरेश डोंगरे -
नागपूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सुरू असलेल्या विकासकामामुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, दोन रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात (वळविण्यात) आले आहेत. यामुळे नागपूरहून किंवा नागपूरसाठी संबंधित गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २१ ते २३ मार्चपर्यंत त्रास सहन करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड - मनमाड भागातील बेलापूर, चितळी आणि पुणतांबा रेल्वे स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंग काम सुरू करण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गाने धावणाऱ्या सहा रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या आणि तारीख पुढील प्रमाणे आहे.
११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस २१ आणि २२ मार्चला तर ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस २२ आणि २३ मार्चला रद्द करण्यात आली.
१२११४ नागपूर-पुणे गरिब रथ एक्सप्रेस २१ मार्चला आणि १२११३ पुणे नागपूर गरिब रथ एक्सप्रेस २२ मार्चला रद्द करण्यात आली आहे. १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस २२ मार्चला तर १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस २३ मार्चला रद्द करण्यात आली आहे.
मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या१२१२९ पुणे - हावडा आझाद हिंद एक्सप्रेस २२ मार्चला दाैंड, वाडी, सिकंदराबाद, बल्लारशहा आणि नागपूर मार्गे वळविण्यात आली आहे. तर, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस नागपूर, बल्लारशहा, सिकंदराबाद, वाडी आणि दाैंड मार्गे धावणार आहे.