मेयो, मेडिकलच्या रुग्णांनी सोडला सुटकेचा नि:श्वास : निवासी डॉक्टरांवरील निलंबन कारवाई मागेनागपूर : सुरक्षेच्या मागणीला घेऊन सोमवारपासून सामूहिक रजेवर गेलेले मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर शनिवारी सकाळी ८ वाजता कामावर परतल्याने रुग्णांसह रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला. शासनाने सुरक्षेची अंमलबजावणी हाती घेतल्यामुळेच आम्ही परतलो, असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर दिलेल्या वेळेत सर्व डॉक्टर हजर झाल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.सलग पाच दिवस निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर होते. यामुळे वरिष्ठ डॉक्टरांवर यांची जबाबदारी आली होती. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या संख्येच्या तुलनेत रुग्णांची संख्या मोठी असल्याने दोन्ही रुग्णालयाचे नियोजन फसले. शेकडो शस्त्रक्रिया रखडल्या. रुग्णांना तासन्तास उपचारासाठी ताटकळत राहावे लागले तर काहींवर विना उपचार घरी परतण्याची वेळ आली. वॉर्डात भरती असलेल्यांवर अर्धवट उपचार करून घरी पाठविण्याचे प्रकारही घडले. एकीकडे रुग्णांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असताना शासनाने सामूहिक रजेवर गेलेल्या मेयो, मेडिकलच्या ४४० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केली. याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उतरले. खासगी डॉक्टरांच्या दोन दिवसांच्या संपामुळे उपराजधानीतील वैद्यकीय सेवा सलाईनवर आली. अखेर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सुरक्षेच्या अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती दिल्यावर ‘आयएमए’ने संपातून माघार घेतली. परंतु निवासी डॉक्टरांची चर्चाच सुरू होती. याला गंभीरतेने घेत शनिवारी ८ वाजेपर्यंत कामावर न परतणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता. मेयो, मेडिकलचे सर्व निवासी डॉक्टर शनिवारी सकाळी ७.३० वाजताच आपापल्या विभागात रुजू झाले. रुग्णसेवेत डॉक्टर आल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला.(प्रतिनिधी)बंदूकधारी पोलिसांच्या पहाऱ्यात रुग्णसेवाशुक्रवारी रात्री पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांनी मेडिकलला भेट देत अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग व अतिदक्षता विभागाची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी चर्चा करून २४ तास बंदूकधारी पोलीस व टीबी वॉर्डात पोलीस चौकीची मागणी तत्काळ मंजूर केली. विशेष म्हणजे, त्याच रात्रीपासून अपघात व अतिदक्षता विभागात पाच बंदूकधारी पोलीस तैनातही केले.सुरक्षेच्या अशा असणार उपाययोजनाप्रत्येक रुग्णालयात २४ तास पाच बंदूकधारी पोलीस.रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘पास’ प्रणाली.रुग्णांसोबत जास्तीत जास्त दोन नातेवाईकांना प्रवेश.डॉक्टरांवर हल्ला झाल्यास ‘डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट-२०१०’ नुसार पोलिसात तक्रार.रुग्णालयात ‘अलार्म सिस्टीम’.५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्र पोलीस सुरक्षा महामंडळाचे ५० सुरक्षा रक्षक तर ३० एप्रिलपर्यंत १८ रक्षकांची भर पडेल. सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचे ‘आॅडिट’.सुरक्षा समितीची स्थापना.‘डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट-२०१०’ची जनजागृती.डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत न्यायालयात प्रलंबित खटले फास्ट ट्रॅकवर चालविण्यासाठी योग्य ती कारवाई.
सहाव्या दिवशी रुजू झाले डॉक्टर
By admin | Published: March 26, 2017 1:38 AM