नागपूर : हिजाबला लावण्यात येणारी टोकदार पीन एका सहावीतल्या मुलीने चुकीने गिळली. ती श्वासनलिकेत जाऊन फसली. मेयोचा कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी व सहकारी डॉक्टरांच्या चमूने विना शस्त्रक्रिया टोकदार पीन यशस्वीरित्या काढून मुलीचे प्राण वाचविले.
संगमनगर येथे राहणारी ११ वर्षीय शबाना (बदलेले नाव) शनिवारी शाळेत गेली. सुटीत आपला हिजाब नीट करण्याकरता तिने पीन काढून दातांमध्ये धरून ठेवली. परंतु आकस्मिकरित्या तिने ती पीन गीळली. तिला त्रास सुरू झाला. तिला घरी नेण्यात आले. आई-वडिलांनी तिला तातडीने मेयो रुग्णालयातील ईएनटी विभागाच्या ‘ओपीडी’त आणले. येथील डॉक्टरांनी तत्परता दाखवित ‘एक्स-रे’ काढला. गिळलेली पीन श्वासनलिकेत फसलेली दिसली. डॉक्टरांच्या चमूने तिला अॉ परेशन थिएटर मध्ये हलविले. विभाग प्रमुख व कॉकलीअर इंप्लांट सर्जन डॉ जीवन वेदी त्यांच्या अनुभव व कौशल्याने विना आॅपरेशनने ‘ब्रोन्कोस्कोपी’द्वारे श्वासनलिकेला कोणतीही इजा होऊ न देता यशस्वीरित्या बाहेर काढली. यात त्यांना डॉ विपीन ईखार, डॉ (मेजर) वैभव चंदनखेडे, निवासी डॉक्टर, तसेच बधिरीकरण तज्ञ डॉ वैशाली शेलगावकर व चमूचे सहकार्य मिळाले.
-तोंडात पीन ठेवणे धोकादायकच
मुली व स्त्रिया तयार होताना साडी पीन, सेफ्टी पीन किंवा इतरही प्रकारच्या पीन दात किंवा ओठांमध्ये पकडून ठेवतात. बऱ्याच वेळा अशा पीन व वस्तू अचानक अकस्मिक रित्या गिळल्या जातात. त्या अन्ननलिकेत किंवा श्वासनलिकेत जाऊन अडकतात. या टोकदार वस्तूंमुळे श्वासनलिकेला किंवा अन्ननलिकेला छिद्र पडून जीव धोक्यात येतो.
- टाचणीसारखी पीन असल्याने काढताना जोखीम
हिजाबला लावणारी पीन ही टाचणीसारखी होती. उपचारात आणखी उशीर झाला असता तर ती श्वासनलिकेत छिद्र पाडण्याची किंवा पुढे ती जाऊन रुतून बसण्याची शक्यता होती. शिवाय काढताना पीन सुटून छिद्र होण्याची भिती होती. परंतु अनुभव व कौशल्याच्या बळावर विना शस्त्रक्रिया श्वसननलिकेतून पीन काढणे शक्य झाले.
-डॉ. जीवन वेदी, प्रमुख, ईएनटी विभाग मेयो