लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रलंबित हप्त्यांची रक्कम लवकरच भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जि.प. प्रशासनाकडून ४ कोटी ४० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.एक जानेवारी २००६ पासून मंजूर करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अमलबजावणी २००८ पासून करण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षाच्या वेतनाच्या फरकाची थकबाकीची रक्कम पाच समान हप्त्यात शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे खात्यात जमा करण्यात येणार होती. सन २०१३-१४ पर्यंत ही रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होणे अपेक्षीत होते. परंतू अनेक शिक्षकांची शेवटच्या पाचव्या हप्त्याची व काही शिक्षकांची मधल्या काही हप्त्याची रक्कम अजूनपर्यंत जमा झाली नव्हती. नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने ही मागणी गेल्या काही दिवसापासून लावून धरण्यात आली होती.जि.प.प्रशासनाने याबाबीची गांभीयार्ने दखल येत नुकताच ४ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करून सर्व पंचायत समितीकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच सबंधीत शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात थकबाकीची रक्कम जमा होणार आहे. जि.प. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या सकारात्मक कार्यवाहीचे नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने स्वागत केले आहे.