नागपूर : आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे कौशल्य विकास योजनेची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे सुशिक्षित बेरोजगारांना इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर आणि मशीनिस्ट आदी ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील ज्या उमेदवारांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कौशल्य विकास योजनेंतर्गत बेसिक ट्रेनिंग सेंटर, वॅगन रिपेअर शॉप रायपूरमध्ये फिटर, वेल्डिंग आणि मशीनिस्टचे प्रशिक्षण देण्यात येईल. तर बेसिक ट्रेनिंग सेंटर मोतीबाग कारखान्यात वेल्डिंगचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, विद्युत लोको प्रशिक्षण केंद्र उसलापूर बिलासपूरमध्ये इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण मिळणार आहे. ज्या उमेदवारांना हे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी तीनपैकी कोणत्याही एका संस्थेत अर्ज करावयाचा आहे. १२ वीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर ट्रेड देण्यात येणार आहे. बेरोजगारांना रेल्वे फक्त प्रशिक्षण देणार असून, त्यांना नोकरी देण्याची कुठलीही योजना नाही. हे प्रशिक्षण तीन आठवड्यांचे म्हणजे १०० तासांचे आणि नि:शुल्क असणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था स्वत: करावयाची आहे. त्यांना कुठलाही भत्ता देण्यात येणार नाही. प्रशिक्षण केवळ दिवसाच देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान एखाद्या प्रशिक्षणार्थ्याचा अपघात झाल्यास तो स्व:त जबाबदार राहणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एक करारनामा सादर करावा लागणार असून, रेल्वे प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे.
...........