कै. एम.एल. मानकर गुरुकुल इंग्लिश स्कूल : नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभनागपूर : शिक्षणाचे झपाट्याने बाजारीकरण होत असताना गुरुकुलसारख्या काही संस्था खऱ्या अर्थाने ज्ञानदानाचे काम करीत आहेत. भविष्यातील रोजगाराच्या आव्हानाला सक्षमपणे समोरा जाणारा विद्यार्थी घडवायचा असेल तर ज्ञानासोबतच कौशल्य विकासाची देखील गरज आहे. अशोक मानकर हे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले काम करीत आहेच. यासोबतच त्यांनी साईल गोधनीमध्ये कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून गावातील तरुणांना प्रशिक्षित करावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.कै. एम.एल. मानकर गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ नागपूर ग्रामीण तालुक्यातील काळाडोंगरी रोड वरील सालई- गोधनी येथे रविवारी पार पडला. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने तर विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, शाळेचे अध्यक्ष माजी आ. अशोक मानकर, सचिव डॉ. बाबा नंदनपवार उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, आजघडीला वाहनांच्या तुलनेत २० टक्के वाहनचालकांची कमतरता आहे. यासाठी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहराच्या एकूण विकासाबाबत बोलताना मेट्रो रिजन १० किमी करणे आणि गावठाणांना ५०० मीटरचे येलो बेल्ट देण्याचा विचार व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. यावेळी, पालकमंत्री बावनकुळे, खासदार तुमाने, अशोक मानकर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेतर्फे चालविण्यात आलेल्या‘अन्नदाता सुखी भव:ह्ण या उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी जमा करण्यात आलेला २ लाख ५१ हजार १५१ रुपयांचा निधी गडकरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. बाबा नंदनपवार यांनी केले. प्रारंभी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित लघुनाट्य सादर करण्यात आले. संचालन देवयानी मास्टे यांनी केले.(प्रतिनिधी)नियम तोडणाऱ्या बिल्डरांना तुरुंगात टाकानियम धाब्यावर बसवून स्वत:च्या नफ्यासाठी अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डर लॉबीचे गडकरींनी कान पिळले. गडकरी म्हणाले, विकास आराखड्यानुसार प्रत्येक शहराचा संतुलित विकास व्हायला हवा. दुर्दैवाने आपल्याकडे तसे होताना दिसत नाही. बिल्डर सातत्याने कारणे देऊन सूट मागतात. थोडी सूट दिली की त्याचा आधार घेत सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करतात. शाळा, बगिच्याच्या जागा हडपायलाही मागेपुढे पाहत नाहीत. रस्त्यासाठी सुद्धा जागा सोडत नाहीत. अशा बिल्डरांना तुरुंगातच टाकायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्ञानासोबतच कौशल्य विकास हवा
By admin | Published: February 22, 2016 3:11 AM