लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबादवरून परतलेल्या नागपूर येथील एका प्रवाशाच्या हातावर रेल्वेस्थानकावर स्टॅम्प लावल्यानंतर शाई लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघाली. त्या प्रवाशाला आपण दुप्पट-तिप्पट प्रवासभाडे देऊनही हाताला जखम झाल्यामुळे पश्चाताप होत आहे.मोहननगर येथील रहिवासी रिचर्ड अँथोनी यांनी सांगितले की, ते २५ जूनला रेल्वेगाडी क्रमांक ०२६९२ नवी दिल्ली-सिकंदराबाद स्पेशल रेल्वेगाडीने हैदराबादला गेले होते. सिकंदराबादला येणाऱ्या किंवा जाणाऱ्या कोणत्याही प्रवाशाच्या हातावर स्टॅम्प लावण्यात आला नाही. येथे काही आवश्यक प्रश्न विचारून प्रवेश देण्यात आला. ते १ जुलैला रेल्वेगाडी क्रमांक ०२४३७ सिकंदराबाद-नवी दिल्ली या गाडीने नागपूरला पोहोचले. नागपूरवरून हैदराबादला जाण्यासाठी त्यांनी २०८९ रुपये प्रवासभाडे दिले आणि परतीच्या प्रवासात ११०९ रुपये दिले. नागपूर रेल्वेस्थानकावर त्यांच्या हातावर क्वारंटाईन करण्यासाठी स्टॅम्प लावण्यात आला. काही तासानंतर स्टॅम्प लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघत होती. २ जुलैला दुपारी त्यांनी डॉक्टरांना आपला हात दाखविला. हाताची त्वचा सोलून निघणारी शाई का वापरण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांना त्वचेचा कोणताही आजार नाही. याबाबत त्यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयास संपर्क केला. परंतु त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी संबंधित प्रवाशाने फ्लॅक्सी भाडे देऊन प्रवास केल्याचे सांगून त्यांच्या हातावर स्टॅम्प लावण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले. याबाबत रेल्वेनेमहापालिकेकडे तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.
रेल्वे प्रवाशाचीही ‘स्टॅम्प’मुळे त्वचा सोलून निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 10:45 PM
व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबादवरून परतलेल्या नागपूर येथील एका प्रवाशाच्या हातावर रेल्वेस्थानकावर स्टॅम्प लावल्यानंतर शाई लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघाली.
ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर मारला क्वारंटाईन स्टॅम्प : शाई ठरली घातक