नागपुरातील वातावरणात गेल्या २४ तासात बदल जाणवला. कालच्यापेक्षा थंडी कमी होती. तापमानाचा पाराही १५.६ अंश सेल्सिअसवर होता. त्यामुळे दिवसाही म्हणावी तशी थंडी नव्हती. शहरात सकाळी ६६ टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली, तर सायंकाळी ४९ टक्के आर्द्रता होती. दृश्यताही कालच्याएवढीच २ ते ४ किलोमीटर नोंदविल्या गेली.
गोंदियातील किमान तापमानाचा पाराही गेल्या २४ तासात वर चढला. १० अंशावरून तिथे १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात कमाल तापमान ३०.९ ते ३१.१ व किमान तापमान १२.४ ते १२.३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.