तिरोडा येथील वीज प्रकल्प : मजूर घेत होते विश्रांती तिरोडा (गोंदिया) : येथील अदानी वीज निर्मिती प्रकल्पात निर्माणाधीन बांधकामाचा स्लॅब कोसळून एक मजूर ठार तर तीन गंभीर जखमी झाले. हा अपघात दुपारी २.४५ च्या सुमारास घडला.तिरोडा येथे अदानी पॉवर हा राज्यातील सर्वात मोठा खासगी वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पातील युनिट क्रमांक ४ लगत गॅमन इंडिया या कंपनीकडून गॅलरीचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या वतीने तिरोड्यातील महेश जैतवार हे सदर बांधकाम पाहात होते. मंगळवारी दुपारी मजूर जेवण करून विश्रांती करीत असतानाच नव्याने टाकलेला स्लॅब कोसळला. याखाली काही मजूर दबल्या गेले. लगेच त्यांना स्लॅबच्या मलब्याखालून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. या अपघातात सुखदेव ताराचंद टेंभेकर (४८) रा.तिरोडा याला गंभीर अवस्थेत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याशिवाय नरेंद्र लटोरे (३७), रा. तिरोडा, दिनेश नागपुरे (३०) रा.दादरी उमरी व शिवाजी यादव (४६) हे तिघे जखमी झाले. यापैकी लटोरे व नागपुरे यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून यादव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना गोंदियाच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असल्याचे अदानी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
‘अदानी’त स्लॅब कोसळला एक ठार, तीन गंभीर
By admin | Published: December 31, 2014 1:05 AM