काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या ३००च्या जवळपास शाळा हाेत्या. त्यातील आतापर्यंत मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या १६१ शाळा बंद पडल्या. सध्या मराठी ५२, हिंदी ६५ व उर्दू माध्यमाच्या ३१ अशा १४८ शाळा सुरू आहेत. त्यातील ८० टक्के शाळांची दुरवस्था झाल्याची माहिती मराठी शाळा वाचवा माेहिमेच्या कार्यकर्त्यांनी दिली. या दुर्लक्षामुळे पुन्हा मराठी माध्यमाच्या ३३, हिंदीच्या २६, तर उर्दू माध्यमाच्या नऊ शाळा मरणासन्न अवस्थेत पाेहोचल्या आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नाही
- मिळालेल्या माहितीनुसार मनपाच्या शाळांचे कधी स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नाही.
- एकाही शाळेत अग्निशमन यंत्र नाही.
- शाैचालय, पाण्याची याेग्य व्यवस्था नाही.
- शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत गेलेल्या आहेत.
- नियमित शाळांप्रमाणे पायलट प्राेजेक्टच्या व डिजिटल शाळा म्हणून घाेषित केलेल्या शाळांची अवस्था सारखीच आहे.
- ७० टक्के शाळेत सिवेजचे पाणी शिरते. छतावरून पावसाचे पाणी गळते.
-------------
सुरेंद्रगडची शाळा जीर्ण झाल्याने ती सुरू करण्यातच येणार नव्हती. या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले हाेते व दुसरीकडे वर्ग भरण्याचे ठरविले हाेते. काेराेनामुळे तशा शाळा बंदच आहेत. ही शाळा जीर्ण झाल्याने अर्थसंकल्पात या शाळेच्या नव्याने बांधकामासाठी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून, लवकरच निविदा काढून काम सुरू करण्यात येईल.
- प्रा. दिलीप दिवे, शिक्षण सभापती, महापालिका