दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही मोठ्या शहरात कामानिमित्त जायचे असल्यास रात्री प्रवास करायचा, सकाळीच पोहोचायचे अन् दिवसभर काम आटोपून सायंकाळी पुन्हा परतीचा प्रवास करायचा, असाच बेत सर्वजण आखतात. त्यामुळे अलीकडच्या काळात स्लीपरक्लास बसेसची मागणी वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळानेही स्लीपरक्लास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दोन स्लीपरक्लास गाड्या दाखल होणार आहेत.एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात सध्या वातानुकूलित ४५ शिवशाही बसेस आहेत. या बसेस अमरावती, यवतमाळ, पुणे, हैदराबाद, पंढरपूर, सोलापूर, नांदेड, वरुड, गडचिरोली, शेगाव, भंडारा मार्गावर धावतात. वातानुकूलित शिवशाही बसेसचा प्रतिसाद मिळाल्यानंतर एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने स्लीपरक्लास गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी मुंबई मुख्यालयाकडे प्रस्ताव रवाना केला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात १५० स्लीपरक्लास बसेस येणार आहेत. नागपूर विभागाच्या प्रस्तावानुसार यातील दोन बसेस नागपूरला पाठविण्यात येणार आहेत. या बसेसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी बसेसचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.
भाडे माफक राहणारनागपुरातून पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळेच पुण्याला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स नेहमीच फुल्ल राहतात. पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यातही नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात तर खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक पुण्याचे तीन हजार रुपये तिकीट प्रवाशांकडून वसूल करतात. पुणे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता, एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने दोन्ही स्लीपरक्लास बसेस पुणे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या या बसेसचा लाभ होणार आहे. याशिवाय दिवाळीच्या काळात प्रवाशांना पुण्याचे खासगी ट्रॅव्हल्ससारखे तीन हजार रुपये भाडे मोजण्याची गरज उरणार नाही.