दयानंद पाईकराव
नागपूर : स्लीपर क्लास कोचमध्ये सर्वसामान्य प्रवासी प्रवास करण्याला प्राधान्य देतात. स्लीपर कोचचे भाडे त्यांच्या आवाक्यात असते. परंतु रेल्वे प्रशासन सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असलेले स्लीपर कोच काढून त्याऐवजी एसी कोच लावण्याला प्राधान्य देत आहे. पूर्वी एका रेल्वेगाडीत १२ स्लीपर कोच असायचे. परंतु आता ही संख्या ७ आणि ८ वर आली असून रेल्वे प्रशासनाने गरीब, मध्यमवर्गीय प्रवाशांच्या खिशाला परवडणारे स्लीपर कोच काढून त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी होत आहे.
साधारणपणे एका रेल्वेगाडीत पूर्वी स्लीपर क्लासचे १२ कोच असायचे. हे सर्व कोच प्रवाशांनी भरलेले असायचे. कोणतीही रेल्वेगाडी असो स्लीपर क्लासमध्ये नेहमीच प्रवाशांना वेटींगचे तिकीट मिळते. एवढी प्रवाशांची पसंती स्लीपर कोचला आहे. स्लीपर कोचचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारे असल्यामुळे बहुतांश प्रवासी स्लीपर क्लास कोचचे तिकीट आरक्षित करतात. परंतु अलीकडच्या तीन-चार वर्षांच्या काळात रेल्वे प्रशासनाने स्लीपर कोच हटविण्याचा सपाटा लावला आहे. सध्या बहुतांश रेल्वेगाड्यात केवळ ६, ७ आणि ८ स्लीपर कोचच पहावयास मिळत आहेत. एसी कोचचे भाडे मध्यमवर्गीय प्रवाशांना परवडत नाही. अशा स्थितीत स्लीपर कोच काढून त्याऐवजी एसी कोच लावून प्रवाशांना रेल्वे प्रशासनाच्यावतीने अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. बुधवारी नागपूर रेल्वेस्थानकावर काही रेल्वेगाड्यांची पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार दृष्टीस पडला. बहुतांश रेल्वेगाड्यात ६ ते ८ स्लीपर कोच आढळले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या हितासाठी एसी रेल्वेगाड्या चालवाव्यात, परंतु मध्यमवर्गीयांचा विचार करून स्लीपर कोच हटवू नयेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
रेल्वेने सामान्य प्रवाशांचे हित जोपासावे
‘रेल्वे मंत्रालयाने सामान्य प्रवाशांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सामान्य प्रवाशांना एसी कोचचे प्रवासभाडे झेपणारे नाही. उन्हाळ्यात एसी कोचची मागणी वाढल्यास रेल्वेने विशेष एसी रेल्वेगाड्या चालवाव्या. मात्र, प्रत्येक रेल्वेगाडीत १२ स्लीपर कोच असणे गरजेचे आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाला संघटनेच्यावतीने पत्रही पाठविण्यात आले आहे.
-बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र
स्लीपर कोच हटवू नयेत
‘प्रवाशांची मागणी असल्यास रेल्वे प्रशासनाने एसी रेल्वेगाड्या चालवाव्यात. परंतु मध्यमवर्गीय प्रवासी पसंती देत असलेले स्लीपर कोच हटवू नयेत.’
-प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे
.......