सौरभ खेकडे
नागपूर : बरेचदा अपघात झाल्यानंतर जखमीला वाऱ्यावर सोडून वाहन चालक पळून जातात. अशा प्रकरणात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जखमीचा मृत्यू होतो. वाहन चालकाने जखमीला रुग्णालयात नेल्याची प्रकरणे क्वचितच पाहायला मिळतात. परंतु, अशी मानवता दाखविणाऱ्याला भविष्यात चांगली फळेही मिळतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशाच एका प्रकरणातील आरोपी वाहन चालकावर दया दाखवून त्याचा कारावास सहा महिन्यांनी कमी केला.
न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. प्रभाकर अस्तुकर (४७) असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे. अपघातानंतर अस्तुकर फरार झाला नाही. त्याने जखमीला रुग्णालयात पोहोचवून सामाजिक कर्तव्य पूर्ण केले. ही बाब प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवली पाहिजे, असे न्यायालय निर्णय देताना म्हणाले.
अशी घडली घटना
९ नोव्हेंबर २०१६ रोजी अस्तुरकरने त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहनाची एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर अस्तुरकरने जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केले, पण त्याचा मृत्यू झाला. अस्तुरकरला गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर अस्तुरकरने उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्याला दिलासा मिळाला.