लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधी आमच्या समस्या जाणून घ्या, त्यानंतर पुढील दौरा करा त्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, अशी आग्रही भूमिका उत्तर नागपुरातील हुडको कॉलनी येथील नागरिकांनी घेतली. मात्र नियोजित दौऱ्यात या कॉलनीचा समावेश नसल्याने महापौरनंदा जिचकार यांनी तुमच्या समस्या सोडविण्यात येईल. तुम्ही तक्रार करा, अशी सूचना केली. यामुळे संतप्त नागरिकांनी महापौरांच्या विरोधात नारेबाजी केली. महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत बुधवारी जरीपटका व नारा घाट भागाच्या दौऱ्याप्रसंगी हा प्रकार घडला.हुडको कॉलनी येथील रस्ता नादुरुस्त आहे. या परिसरात गेल्या काही दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. प्रभागाचे नगरसेवक महेंद्र धनविजय व अन्य नगरसेवकांकडे तक्रार करूनही समस्या मार्गी लागत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. याचा उद्रेक महापौरांच्या दौऱ्याप्रसंगी झाला.उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमधून वाहणाऱ्या नाल्यांमुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय परिसरातील कचरा वेळेवर उचलण्यात येत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. परिणामी विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आले. याची दखल घेत त्यांनी तातडीने कचरा उचलून नाल्यांची सफाई करण्याचे निर्देश दिले.यावेळी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समिती विजय झलके, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे,ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला प्रीतम मंथरानी, सुषमा संजय चौधरी, ममता महेश सहारे, स्नेहा विवेक निकोसे, अपर आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, उपअभियंता कल्पना मेश्राम, कमलेश चव्हाण यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.महापौरांनी बेझनबाग येथील हर्षवर्धन बुद्धविहारामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालार्पण करून दौऱ्याला सुरुवात केली. जरीपटका चौकातील जिंजर मॉलसमोरील भाजीबाजाराला भेट दिली. भाजीबाजारामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.भाजीबाजारासाठी जागा निश्चित असतानाही रस्त्यावर दुकाने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी दुकाने हटवून त्यांना भाजीबाजारात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. परिसरातील दहनघाटावर प्रसाधनगृह बांधून तयार असून केवळ पाण्याअभावी ते सुरू नाही. या ठिकाणी त्वरित पाण्यासाठी पाईपलाईन टाकून हे प्रसाधनगृह सुरू करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.नाल्याची भिंत पडल्याने धोकाइंदोरा-बेझनबाग येथील सुदर्शन कॉलनी येथे नाल्याची भिंत पडल्याने नाल्यालगतच्या घराला धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रभागातील नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. यासाठी प्रस्ताव तयार करून त्वरित भिंत बांधण्यात यावी, असे निर्देश नंदा जिचकार यांनी दिले.कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोकामुकुंदराव आंबेडकरनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्याजवळ कचरा जमा करण्यात येतो. तो कचरा अनेक दिवस उचलला जात नाही. या नाल्यालगतच गुरू नानक स्कूल असल्याने शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येत डेंग्यूची लागण झाल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. महापौरांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.नाल्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्तख्रिश्चन कॉलनी परिसरात नाल्याच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्यात येथील दुर्गामंदिर पाण्यात बुडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली तसेच परिसरात पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास आणले. यावर योग्य उपाययोजना करून नाल्यातील व नाल्यालगतचा गाळ काढून झाडेझुडपे व केरकचरा हटवून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. सुदर्शन वाल्मिकी चौकामध्ये सुदर्शन वाल्मिकी समाजभवन निर्माण, रस्त्यावरील खड्डे बुजविणे आदी मागण्या परिसरातील नागरिकांनी यावेळी केल्या.रेल्वेमुळे पाणीटंचाईकामठी रोडवरील पंजाबी लाईनमध्ये पाण्याची समस्या आहे. या परिसरात पाणी पुरवठ्यासाठी रेल्वे पुलाखालून पाईपलाईन टाकणे आहे. मात्र त्यासाठी रेल्वेची परवानगी मिळणे आवश्यक आहे. अशात या परिसरात दोन बोअरवेल तातडीने उभारून येथील नागरिकांना दिलासा द्या, असे निर्देश नंदा जिचकार यांनी दिले.पालकमंत्र्यांचा जनता दरबार ३ डिसेंबरलानागपूर महापालिका क्षेत्रातील झोननिहाय, प्रभागनिहाय समस्या ऐकून घेण्यासाठी, महत्त्वाच्या समस्यांवर, प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ३ डिसेंबर ते ११ फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक सोमवारी झोननिहाय जनता दरबार घेणार आहे. याअंतर्गत ३ डिसेंबरला मंगळवारी झोनमध्ये पालकमंत्र्यांचा जनता दरबार होणार आहे. यावेळी नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन यावेळी नंदा जिचकार यांनी केले.