निशांत वानखेडेनागपूर : रविवारी उशीरा रात्री सुरू झालेला पाऊस साेमवारी सकाळपर्यंत संथपणे सततधार सुरू हाेता. नागपुरात रात्रीच्या रिपरिपीनंतर सर्वाधिक ७८.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. साेमवारी दिवसभर मात्र आकाशात जमलेल्या ढगांनी शांतता बाळगली. विदर्भात पावसाची तुट अद्यापही ६८ टक्के एवढी आहे.
विदर्भात मान्सून बराच उशीरा म्हणजे २३ जूनला सक्रिय झाला. अति जाेरदार पावसाचा इशारा दिला असला तरी अद्यापही त्याप्रमाणे बरसात झाली नाही. त्यामुळे जून महिन्याची एकूण सरासरी गाठायला पुढल्या चार दिवसात मुसळधार पावसाची गरज आहे. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे मात्र माेठी तुट भरून काढायला मदत मिळाली. विदर्भात या महिन्यात १४० ते १५० मि.मी. पावसाची नाेंद अपेक्षित हाेती पण आतापर्यंत केवळ ४४.६ मि.मी. पावसाचीच नाेंद झाली आहे. त्यामुळे पावसाचा बॅकलाॅग ६८ टक्क्यांवर आहे. नागपुरात ही तुट सर्वात कमी ४३ टक्के आहे. इतर जिल्ह्यात मात्र ७५ ते ८० टक्के बॅकलाॅग बाकी आहे.
दरम्यान साेमवारी दिवसा ब्रम्हपुरी २० मि.मी. व गाेंदियामध्ये १८ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. त्याखाली गडचिराेली व अकाेल्यात ५ मि.मी. पाऊस झाला. इतर जिल्ह्यात ढगांचा जाेर शांत हाेता. रविवारी रात्री मात्र नागपूरनंतर चंद्रपूरला ५७.४ मि.मी., अमरावती २२.२ मि.मी., भंडारा २० मि.मी., यवतमाळ ४० मि.मी. वर्धा २७.७ मि.मी. व अकाेल्यात १८.९ मि.मी. पाऊस झाला.
सर्वदूर पावसामुळे दिवसाचे तापमान माेठ्या प्रमाणात खाली घसरले. अकाेला, अमरावतीत ५.९ व ४.८ अंशाने पारा घसरला. यवतमाळमध्ये सर्वाधिक ७.५ अंशाने घसरत २७.२ अंशावर पाेहचला. नागपुरात सर्वाधिक ३२ अंश तापमानाची नाेंद झाली. रात्रीचा पारा मात्र सरासरीच्या खाली घसरला आहे.