नागपूर : मनपा प्रशासन आर्थिक टंचाईचे रडगाणे गात आहे. मात्र संपत्ती कर व पाणी करानंतर नगर रचना विभाग हेच मनपाच्या उत्पनाचे मुख्य साधन असते. मात्र या विभागाच्या ढीम्मपणामुळे या वर्षी उत्पन्नात नागपूर मनपा माघारली आहे.
२०१९-२० मध्ये नगर रचना विभागाला एकूण १०८.३४ कोटी रुपयाचे उत्पन्न झाले होते. मात्र २०२०-२१ च्या प्रारंभातील ९ महिन्यात फक्त २३.१६ कोटी रुपयाचे उत्पन्न झाले. मागील आर्थिक वर्षात याच नऊ महिन्याच्या काळामध्ये नगर रचना विभागाला ९०.०४ कोटी रुपयांची कमाई झाली होती. या माघारलेपणाचे खापर अधिकारी आता कोरोनाच्या संक्रमणावर फोडत आहेत. प्रत्यक्षात या विभागातील अधिकाऱ्यांच्या ढिलाईमुळेच ही पाळी आली असून, ६६.८८ कोटी रुपयांनी उत्पन्नात तूट झाली आहे.
नासुप्रच्या गुंठेवारी ले-आऊटचे अधिकार मनपाच्या नगर रचना विभागाला मिळाल्यानंतरही अधिकारी संबंधित ले-आऊटच्या प्लॉटला मंजुरी देताना टाळाटाळ करीत असतात. विभागातील कुण्या विशिष्ट व्यक्तीच्या माध्यामातून नकाशा किंवा प्लॉट मंजूर करताना मात्र काम सोपे होते. परंतु त्यासाठी खिसा ढिला सोडावा लागतो. नियमांमधील तरतुदींचाही यात फायदा होतो. याच कारणामुळे या विभागाची कमाई मागे पडली आहे.
या विभागाची ‘लकीर के फकीर’ ही नीतीही उत्पन्नास बाधक ठरत आहे. नियमावर बोट ठेवून नकाशा अडविला जातो. अखेर नागरिक नियम तोडृून बांधकाम करतात. कर्मचारी कमी असल्याचे कारण देऊन नगर रचना विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी झटकतात. मात्र या विभागात मागील अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेले अधिकारी नकाशा मंजुरीत अडथळा घालतात.
...
महापौर बैठक बोलाविण्याच्या मानसिकतेत
महापौर दयाशंकर तिवारी यांनी या मुद्यावर नगर रचना विभागाची बैठक बोलावण्याची तयारी केली आहे. पदभार ग्रहण करतानाच त्यांनी यासंदर्भात सूतोवाच केले होते. थांबलेले नकाशे मंजूर करणे आणि मनपाचे उत्पन्न वाढविण्यासंदर्भात त्यांनी सूचक उद्गार काढले होते.