लक्ष्मीनगरातील प्रदीर्घ संघर्षाला यश: ५५ लाभार्थींचे पट्टे पंजीबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपडपट्टीवासीयांना मालकीपट्टे देण्याची घोषणा पाच वर्षापूर्वी केली होती. परंतु यासाठी झोपडपट्टीधारकांना संघर्ष करावा लागत आहे. दक्षिण-पश्चिम विघानसभा मतदार संघातील उच्चभ्रूंची मोठी वसाहत असलेल्या लक्ष्मीनगर भागात अत्यंत मोक्याच्या नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर सुमारे ४५ वर्षांपासून वसलेल्या १०५ पैकी ५५ लाभार्थींचे मालकी पट्टे आतापर्यंत दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात पंजीबद्ध झाले असून इतरांच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
लक्ष्मीनगर झोपडपट्टीवासीयांनी मालकीपट्ट्यांसाठी शहर विकास मंचच्या नेतृत्त्वात लढा उभारला होता. अडथळे पार करून या लढ्याला यश आले. येथील झोपडीधारक त्यांच्या घराच्या जमिनीचे मालक झाले आहेत. येथील ९५ टक्के घरे पक्की आहेत. मौजा अजनीच्या खसरा क्र. ३ वरील सव्वा एकर (०.४९८ हेक्टर) एवढ्या क्षेत्रावर सुव्यवस्थित पद्धतीने वसलेली ही झोपडपट्टी चारही बाजूंनी बंगले आणि फ्लॅट स्किमनी वेढलेली आहे आणि या मुळेच या झोपडपट्टीवर अनेकांची वक्रदृष्टी होती.
या झोपडपट्टीला १३ जुलै १९८९ रोजी महाराष्ट्र सरकारने अधिकृत घोषित केले, परंतु, झोपडपट्टीवासीयांवर नेहमी निष्कासनाची टांगती तलवार होती. त्यामुळे वस्तीतील नागरिकांनी स्थानिक कार्यकर्ते रामदास उईके यांच्या पुढाकाराने लक्ष्मीनगर झोपडपट्टी सुधार समितीची स्थापना करून शहर विकास मंचच्या नेतृत्त्वात २००४ पासून मालकी पट्ट्यांसाठी संघर्ष सुरू केला. मंचचे संयोजक अनिल वासनिक व इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. लीना बुद्धे यांची साथ मिळाली.
महाराष्ट्र सरकारने १६ जुलै २०१६ व २४ ऑगस्ट २०१६ रोजी दोन शासनादेश काढून नागपुरातील झोपडपट्टीघारकांना मालकी पट्टे देण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार नासुप्रने पट्टे वाटपासाठी पहिल्या टप्प्यात निर्धारित केलेल्या ५२ वस्त्यांमध्ये लक्ष्मीनगर झोपडपट्टीचाही समावेश होता. परंतु, ही जागा शाळेसाठी आरक्षित असल्याने पट्टे वाटपात अडथळा निर्माण झाला होता.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये या झोपडपट्टीच्या जागेवरील आरक्षण रद्द व जमीन वापर बदलवून जमिनीचा रहिवासी प्रयोजनार्थ फेरबदल करावा, यासाठी मंचच्या पदाधिकाऱ्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. अखेर नासुप्रच्या पत्रानुसार मनपा सभागृहात मंजुरी देण्यात आली.
...
मेळावा घेऊन आनंदोत्सव
सततच्या पाठपुराव्यानंतर प्रन्यासने ५ जानेवारी २०२१ पासून वस्तीवासीयांना पट्टे वाटप व पट्ट्यांचे पंजीकरण सुरू केले. ५५ लाभार्थीचे पट्टे पंजीबद्ध आणखी १५ पट्ट्यांचे पंजीकरण येत्या आठवड्यात होणार आहे. लक्ष्मीनगर झोपडपट्टीवासीयांच्या यशस्वी लढ्यात अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, रामदास उईके, अश्विन पिल्लेवान, विमल बुलबुले, शैलेंद्र वासनिक, व युवा शहरचे नितीन मेश्राम, नीलेश खडसे यांचे मोठे योगदान आहे. लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी रविवारी विजय मेळावा घेऊन आपला आनंद साजरा केला.
...
जनशक्तीचा विजय
नागरिकांनी एकजूट करून दिलेल्या अविरत लढ्यामुळे लक्ष्मीनगर झोपडपट्टीवासीय घराच्या जमिनीचे मालक झाले आहेत. जमिनीवरील आरक्षण हटविण्यातही आडकाठी होती. परंतु, सर्व अडथळ्यांवर मात करीत मालकी पट्टे हस्तगत केले आहेत. सामान्य जनता हक्कांसाठी जागृत झाल्यास सर्व अडथळ्यांवर मात करता येते. हा जनशक्तीचा विजय आहे.
-अनिल वासनिक (संयोजक, शहर विकास मंच)