लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शहरी जीवनमानासोबतच ग्रामीण जीवनमानावरही होत आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे.या परिस्थितीमध्ये शासनाकडून काही विशेष पॅकेज जाहीर होणार का, असा प्रश्न बारा बलुतेदार व्यवसायातील नाभिक, परीट, सुतार, कुंभार, गुरव, भोई, शिंपी, सोनार, बेलदार, लोहार, साळी, भावसार, ग्रामजोशी, कोळी, चर्मकार यांच्याकडून विचारला जात आहे. बलुतेदार वर्ग हा बहुतांशी भूमिहीन असल्याने त्यांची गुजराण व्यवसायांवरच अवलंबून आहे. यातील ९० टक्के व्यावसायिकांची दुकाने, घरे भाडेतत्त्वावर असून अनेकांवर पतसंस्था, बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत या कर्जाला मुदतवाढ मिळून संपूर्ण व्याज व दंड माफ करण्यात यावे, तसेच भूमिहीन व्यावसायिकांचे घरगुती व व्यावसायिक वीजबिल माफ करावे, अशी मागणी बारा बलुतेदारांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कोरोनामुळे बारा बलुतेदारांवर ओढवत असलेल्या समस्यांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून बांधकाम कामगारांप्रमाणे योजनेत समाविष्ट करून घ्यावे व दोन हजारांची आर्थिक मदत करावी, अशी मुख्यमंत्र्यांना ट्विटच्या माध्यमातून मागणी केली आहे.
ऐन हंगामात फटकालॉकडाऊनमुळे या समाजातील व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लग्न, समारंभ, यात्रा महोत्सव यासह विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने बारा बलुतेदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नसराई व यात्रा हा त्यांचा हंगाम असतो. यावर वर्षभराची गुजराण होते. मात्र ऐन हंगामात लॉकडाऊन झाल्याने हा वर्ग हतबल झाला आहे. जवळचे तुटपुंजे भांडवल व्यवसायात गुंतवले असल्याने हाताशी काहीच रोकड शिल्लक नसल्याने अनेकांचे भविष्य काळवंडले आहे.या वर्गाला त्वरित मदत न मिळाल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांवर मोठा अनर्थ ओढवू शकतो. ही परिस्थिती शोकांतिकेत बदलू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत. दरमहा ५ हजार रुपयांची मदत त्वरित करावी व लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवसायांना उभारी देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.- कल्याण दळे, राज्याध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघ