लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच स्वच्छता अॅपच्या माध्यमातूनही शहरातील स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. निवडक वॉर्डात स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, यशस्वी झाल्यास तो राज्यातील नगर पालिकांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.केंद्र शासनाने २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यात राज्यातील नगर पालिका हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार मोहपा पालिकेने त्यात सहभाग नोंदवीत प्रथम क्रमांक पटकावला. मोहपा ही नगर परिषद जिल्ह्यातील जुन्या १० नगर परिषदांपैकी सर्वात लहान ‘क’ वर्ग नगर परिषद आहे. मात्र तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही नगर परिषद पहिल्या क्रमांकावर आहे. नागरिकांच्या समस्या नोंदविण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम टोल फ्री क्रमांक देणाऱ्या या नगर परिषदेने शहराच्या स्वच्छतेसाठी आता अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
आॅनलाईन राहणार ‘वॉच’स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने कचरा संकलनासाठी स्वत:चे अॅप विकसित केले आहे. शहरातील सर्व मालमत्ताधारकांना एक युनिक स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. कार्डच्या मागे क्यूआर कोड असणार आहे. प्रत्येक कुटुंबाने दररोज त्यांच्याकडील ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून कचरागाडीत टाकल्यानंतर कचरा संकलक त्याच्याकडील मोबाईलद्वारे कार्डचा क्यूआर कोड स्कॅन करेल. लगेच कचरा संकलनाची माहिती सर्व्हरवर अपलोड होईल. कोणत्या कुटुंबाकडून कचरा संकलित केला, केव्हा केला याची डिजिटल स्वरूपात नोंद होणार आहे. त्यामुळे कचरा संकलनाच्या कामातील हयगय, टाळाटाळ, नागरिकांच्या तक्रारी याला आळा बसणार आहे. कचरागाडी सध्या कोठे आहे, संकलनाच्या दैनिक, आठवडी, मासिक अहवालासोबतच कचरागाडीत कचरा न टाकता इतरत्र टाकणारे ओळखता येणार आहे. या प्रणालीवर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ‘आॅनलाईन वॉच’ राहणार आहे.
नागरिकांचे सहकार्य गरजेचेसध्या वॉर्ड क्र. १, १० आणि १२ साठी या प्रणालीचा वापर करण्यास नगर पालिकेने सुरुवात केली आहे. यात नगराध्यक्ष, पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यानेच शहर स्वच्छ राहील.- हरिश्चंद्र टाकरखेडे,मुख्याधिकारी, न.प. मोहपा.